

rat2p18.jpg-
O73761
साखरपा : कनकाडीतील ग्रामस्थांबरोबर संवाद साधताना रेन ट्री संस्थेचे किशोर रक्षे व अन्य सदस्य.
पर्यावरण संवर्धनासाठी शास्त्री किनारी सर्व्हे
रेन ट्री, सम्यू इकोलॉजिकलचा पुढाकार; कनकाडीतील ग्रामस्थांशी संवाद
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. २ : संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदी परिसर आणि इतर गावांमधून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी रेन ट्री फाउंडेशन आणि सम्यू इकोलॉजिकल फाउंडेशनतर्फे काम करण्यात येणार आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या कनकाडी गावातील ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला असून, पर्यावरण आणि वातावरणीय बदलासंदर्भात विविध विषयांवर सर्वेक्षण करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत गावात वर्षातील तिन्ही ऋतूंमध्ये होणाऱ्या पर्यावरणीय बदलांची माहिती संकलित केली जात आहे. कनकाडी येथे दोन्ही फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी गावात फिरून पावसाळेत्तर हंगामातील पाहणी व सर्वेक्षण केले. या प्रसंगी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित ग्रामस्थांशी पदाधिकाऱ्यांनी सविस्तर संवाद साधला. यामध्ये गावात आढळणारे दुर्मिळ पक्षी, जंगली प्राणी तसेच दरवर्षी लागणाऱ्या वणव्यांची संभाव्य कारणे व त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांवर सखोल चर्चा झाली. याशिवाय घरोघरी तयार होणारा ओला व सुका कचरा, त्याचे संकलन आणि विल्हेवाट याविषयी ग्रामस्थांकडून माहिती घेण्यात आली. तसेच ग्रामसेवक वैभव शिंदे यांची मुलाखत घेऊन विविध विषयांवर त्यांची मते जाणून घेण्यात आली.
या प्रसंगी ग्रामस्थांनी रेन ट्रीच्या पदाधिकाऱ्यांना विविध समस्या सांगितल्या. त्यात लक्ष्मीकांत गाताडे यांनी गावात लागणाऱ्या वणव्यांचा प्रश्न अत्यंत बिकट असल्याचे सांगितले. माजी ग्रामपंचायत सदस्या रेवती पंडित यांनी गावातील दुर्मिळ पक्षी व प्राण्यांच्या संवर्धनाची तातडीची गरज असल्याचे स्पष्ट केले. ग्रामस्थ अनिल जाधव यांनी स्थानिक खडी क्रशरमुळे होणाऱ्या प्रदुषणाचा प्रश्न गंभीर बनत असून, त्यावर तातडीने उपाययोजना केल्या पाहिजे, अशी सूचना केली. या दौऱ्यात रेन ट्री फाउंडेशनचे किशोर रक्षे, श्रुतिका चव्हाण, रामचंद्र बोदले, सम्यू इकोलॉजिकल फाउंडेशनचे डी. पी. श्रीवास्तव, अमेय पारकर, कुमार पाटील, तन्मय चेंबूरकर आणि नितीश बोदरे उपस्थित होते.
चौकट
नैसर्गिक पाणवठ्यांचे जतन करा
कनकाडी गावातील नैसर्गिक पाणवठ्यांचे जतन करणे आवश्यक असून, ऐतिहासिक पांडवकालीन टाक्यांची स्वच्छता व संवर्धन करण्याची मागणी अमित पंडित यांनी केली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या पाणवठ्यातील पाण्याचा उपयोग ग्रामस्थांना दैनंदिन वापरासाठी होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.