स्थायी समिती निवडीकडे लक्ष
मुंबई महापालिका
‘स्थायी’ निवडीकडे लक्ष
सदस्यपदासाठी महायुतीचे पारडे जड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष महापालिकेची ‘तिजोरी’ मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सदस्य निवडीकडे लागले आहे. महापौरांपेक्षाही अधिक आर्थिक अधिकार असलेल्या या वैधानिक समितीवर आपली वर्णी लागावी, यासाठी सर्वच पक्षांतील दिग्गज नगरसेवकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
स्थायी समिती महापालिकेची सर्वात महत्त्वाची समिती असून, मुंबईतील सर्व विकास प्रकल्प, कंत्राटे आणि आर्थिक तरतुदींना या समितीमध्ये मंजुरी दिली जाते. या समितीच्या एकूण २७ सदस्यांमध्ये शिक्षण समिती अध्यक्षांचा समावेश असतो. सध्याच्या पक्षीय संख्याबळानुसार, महायुती आणि विरोधी पक्षांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे.
संख्याबळाचे गणित
स्थायी समितीत भाजपकडे १० आणि शिवसेनेकडे तीन असे मिळून महायुतीचे १३ सदस्य आहेत. भाजपचा शिक्षण समिती अध्यक्ष हा पदसिद्ध सदस्य असल्याने महायुतीचे एकूण संख्याबळ १४ वर पोहोचते. दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गट आठ, काँग्रेस तीन, एमआयएम आणि मनसे प्रत्येकी एक असे मिळून विरोधकांचे संख्याबळ १३ होते. अशा स्थितीत एमआयएमने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यास महायुतीचा मार्ग अधिक सुकर होणार आहे.
संभाव्य नावांची चर्चा
पक्षीय पातळीवर या समितीसाठी अनुभवी नावांची चर्चा सुरू आहे. भाजपमार्फत प्रभाकर शिंदे, ॲड. मकरंद नार्वेकर, राजश्री शिरवाडकर, प्रकाश दरेकर आणि नील सोमय्या, शिवसेनेकडून तृष्णा विश्वासराव आणि अमेय घोले, तर शिवसेना ठाकरे गटाकडून किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत आणि श्रद्धा जाधव यांच्या नावांची चर्चा आहे. याशिवाय काँग्रेसकडून अश्रफ आझमी, मनसेचे यशवंत किल्लेदार आणि एमआयएमचे विजय उबाळे यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

