

माथेरानमधील प्रदूषणाबाबत
उत्तरासाठी दोन आठवडे मुदत
न्यायालयाचे नगरपरिषदेला निर्देश
कर्जत, ता. ३१ : थंड हवेचे ठिकाण माथेरानमधील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हरित लवादाने अश्वपाल संघटना व माथेरान नगर परिषदेला उत्तर सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. न्यायाधीश डी. के. सिंग यांनी मंगळवारी (ता. २४) झालेल्या सुनावणीत आदेश दिला.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जानेवारीत सादर केलेल्या अहवालात माथेरानमधील हवा, पाणी व माती प्रदूषित झाल्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे माथेरानमध्ये कोणतेही प्रदूषण करणारे उद्योगधंदे किंवा पेट्रोलवरील वाहने नसतानाही प्रदूषणाची पातळी धोकादायक टप्प्यावर पोहोचल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे. हा अहवाल लोणेर, माणगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठाने शास्त्रोक्त पद्धतीने तयार केला आहे. अहवालानुसार घोड्यांच्या लिदमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
घोड्यांची संख्या मर्यादित
प्रदूषण कमी करण्यासाठी मंडळाने काही महत्त्वाच्या उपाययोजना सूचवल्या आहेत. यात घोड्यांची संख्या मर्यादित करणे, घोड्यांचे तबेले पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राबाहेर हलविणे आणि घोड्यांसाठी निश्चित मार्ग तयार करणे यांचा समावेश आहे.
पुढील सुनावणी जूनमध्ये
माथेरान पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्र असल्याने येथील पर्यावरणाचे रक्षण व्हावे, यासाठी सुनील शिंदे व केतन रामाणे यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. तुषार कुमार यांनी बाजू मांडली. नगर परिषदेकडून ॲड. दीपाली वैद्य-गोंधळेकर, तर अश्वपाल संघटनेतर्फे ॲड. दीपाली बागला यांनी युक्तिवाद केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी नऊ जूनला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.