फलटण शहर - न्यायासाठी तोडले हाताचे बोट
भावाला न्याय मिळण्यासाठी
तोडले स्वत:च्या हाताचे बोट
आत्महत्या प्रकरणी कारवाई नसल्याने कृत्य
सातारा, ता. १८ : उल्हासनगरचा भाऊ व भावजयीच्या आत्महत्येस वीस दिवस होत आले, तरी संशयितांवर कारवाई झालेली नाही. यामुळे व्यथित होऊन लहान भावाने आपल्या हाताचे बोट तोडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियातून प्रसारित केला आहे. धनंजय आत्माराम ननावरे (रा. मांडवखडक, ता. फलटण) असे त्याचे नाव असून, त्याला उपचारासाठी पुण्यात हलविण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई व मोदी सरकार काय करतेय, असा सवालही ननावरे यांनी व्हिडिओद्वारे केला आहे. न्याय मिळेपर्यंत दर आठवड्याला आपल्या शरीराचा एक भाग तोडून सरकारला पाठविणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
उल्हासनगरच्या दिवंगत माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहायक म्हणून धनंजय आत्माराम ननावरे यांचे मोठे बंधू नंदकुमार आत्माराम ननावरे यांनी काम केले होते. नंदकुमार व त्यांची पत्नी उज्ज्वला यांनी एक ऑगस्ट रोजी बंगल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यांनी आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ केला होता, त्यामध्ये आपण का आत्महत्या करीत आहोत व यास कोण कोण जबाबदार आहेत, त्यांची नावेही त्यांनी सांगितली होती. या घटनेला वीस दिवस होत आले, तरी तपासाला गती मिळालेली नाही. गावामध्ये आमच्यावर मोठा दबाव येतोय. या प्रकरणात मोदी सरकारमधील एक केंद्रीय मंत्री असल्याचेही धनंजय ननावरे यांनी व्हिडिओत म्हटले असून, आम्हाला न्याय मिळणार आहे की नाही, असा सवालही त्यांनी व्यक्त केला आहे. न्याय मिळावा, यासाठी आपण दर आठवड्याला आपल्या शरीराचा एक भाग फडणवीस यांना भेट म्हणून पाठविणार आहे. आमच्या कुटुंबीयांची वाताहात होत असेल, तर जगण्यात अर्थ तरी काय आहे? असा सवाल त्यांनी व्हिडिओत केला. माझ्या बंधूंनी नाव घेतलेले प्रतिष्ठित तसेच राजकीय व्यक्ती आहेत, असे म्हणत ननावरे यांनी स्वतः आपल्या डाव्या हाताचे बोट कोयत्यासारख्या हत्याराने तोडले असल्याचे व तुटलेल्या बोटाचा भाग आपण भेट म्हणून देणार असल्याचे दाखविताना व्हिडिओत दिसत आहे. दरम्यान, याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत कुठलीही नोंद झालेली नव्हती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

