

विश्वविक्रमासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षकांचा पुढाकार
‘सकाळ’चा उपक्रम; सर्वांत मोठा पुस्तकांच्या छायाचित्रांचा ऑनलाइन अल्बम उपक्रम
पुणे, ता. ७ : लहान मुलांच्या सहभागातून वाचन संस्कृती अधिक वृद्धिंगत होण्यासाठी आणि मुलांमध्ये वाचनाची गोडी लावण्यासाठी शहरातील शाळांनी ‘सर्वांत मोठा पुस्तकांच्या छायाचित्रांचा ऑनलाइन अल्बम’ हा विश्वविक्रम नोंदविण्यासाठी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेतला आहे. पुणे पुस्तक महोत्सवांतर्गत ‘सकाळ’च्या वतीने हा विश्वविक्रम करण्यात येत आहे. यात आता शाळा, विद्यार्थी, शिक्षक, पालकही मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत.
राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे पुण्यात ‘पुणे पुस्तक महोत्सव’ १४ ते २२ डिसेंबर दरम्यान होत आहे. महोत्सवाचे औचित्य साधून पुणे पुस्तक महोत्सव, सकाळ माध्यम समूह, राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने ‘सर्वांत मोठा पुस्तकांच्या छायाचित्रांचा ऑनलाइन अल्बम’ या विश्वविक्रमांची नोंद ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करण्यात येणार आहे. यात सहभागी होण्यासाठी शहरातील शाळांनी पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी म्हणून शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्याअंतर्गत शाळांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे छायाचित्र काढून संबंधित क्यूआर कोडवर ती अपलोड करण्याच्या सूचना शाळांकडून दिल्या जात आहेत. काही शाळांनी हे अभियान प्रत्यक्ष शाळेत राबविले.
सहभागी होण्यासाठी हे करा
- सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करा आणि तुमची माहिती भरून तुमच्याकडील पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे छायाचित्र संबंधित लिंकवर अपलोड करा
- एकावेळी एका छायाचित्रात केवळ एका पुस्तकाचेच मुखपृष्ठ दिसेल, असे छायाचित्र तुमच्या मोबाईलच्या साहाय्याने काढून पाठवावे
- छायाचित्रात पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि चारही बाजूंनी सोडलेल्या थोड्याशा जागेव्यतिरिक्त अन्य काहीही नसावे
- एकावेळी फक्त एका पुस्तकाचे छायाचित्र काढून पाठविणे, असे एक व्यक्ती एकामागून एक असे कितीही पुस्तकांच्या मुखपृष्ठांचे छायाचित्र काढून वेगवेगळे पाठवू शकतो
- अनेक पुस्तके असतील, तर एकत्रित मुखपृष्ठांचे छायाचित्र पाठवू नये. प्रत्येक पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे वेगवेगळे छायाचित्र पाठवावे
- मुखपृष्ठाचे छायाचित्र काढताना पुस्तकाचे नाव व्यवस्थित दिसेल, असे छायाचित्र काढावे
०००
पुणे पुस्तक महोत्सव आणि ‘सकाळ’तर्फे जगातील सर्वांत मोठा पुस्तकांच्या छायाचित्राचा ऑनलाइन अल्बम तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये सर्व स्तरातील शालेय मुले, महाविद्यालयीन तरुण, शिक्षक, साहित्यिक, लेखक, वाचक सहभागी होत आहेत. अतिशय स्तुत्य असा उपक्रम ‘सकाळ’ने हाती घेतला आहे. यानिमित्त आपण विश्वविक्रम करणार आहोत. याचा प्रत्येकाला अभिमान असणार आहे. यानिमित्ताने किमान प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात, कुटुंबात वाचनाची गोडी निर्माण होऊन वाचन संस्कृती नक्कीच वाढण्यास मदत होईल. चला तर मग, आपणच पुढाकार घेऊन आपल्या घरातील, शाळेतील म्हणजे ग्रंथालयातील जेवढी पुस्तके असतील, तेवढ्या पुस्तकांच्या मुखपृष्ठाचा फोटो काढून दिलेल्या क्यूआर कोडमध्ये अपलोड करा आणि पुन्हा एकदा नव्याने पुस्तक आणि त्याचे लेखक यांची ओळख करून घेऊ या, त्यावर कुटुंबातील सदस्यांसोबत चर्चा करू या.
- संजय सोमवंशी, मुख्याध्यापक, सुंदरबाई मराठे विद्यालय (खराडी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.