गोवळ जमीन घोटाळा प्रकरणी राजापूर दुय्यम निबंधकांच्या चौकशीचे आदेश

the topic of goval land fraud in ratnagiri abdul sattar is in kokan tour
the topic of goval land fraud in ratnagiri abdul sattar is in kokan tour

राजापूर : तालुक्‍यातील बारसू - गोवळ परिसरातील प्रस्तावित एमआयडीसीअंतर्गंत गोवळ येथील बंद सातबारावरील जमिनीच्या झालेल्या खरेदी-विक्रीप्रकरणी राजापूर दुय्यम निबंधकांच्या चौकशीचे आदेश महसूल राज्यमंत्री अब्दुर सत्तार यांनी येथील प्रांताधिकारी प्रवीण खाडे यांना दिले.

संबंधित जमीन खरेदी-विक्री प्रकरणी दुय्यम निबंधक यांच्या कारभाराची सखोल चौकशी करून त्याचा सविस्तर अहवाल येत्या पंधरा दिवसांमध्ये सादर करण्याची सूचना त्यांनी केली. त्यामुळे या चौकशीमधून आता नेमके काय निष्पन्न होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

अवकाळी पाऊस आणि त्यातून निर्माण झालेल्या पूरस्थितीमध्ये भातशेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महसूल राज्यमंत्री सत्तार कोकण दौऱ्यावर आले आहेत. येथील प्रांत कार्यालयामध्ये शेतीच्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गोवळ वरचीवाडी येथील सात सातबारा प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाने बंद करण्यात आले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी होण्यापूर्वी या सातबारा उताऱ्यांवरील जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत नोंदवले गेले आहेत.

मंत्री सत्तार यांनी याप्रकरणी संबंधित दुय्यम निबंधकांची चौकशी करून त्याचा सविस्तर अहवाल येत्या पंधरा दिवसांमध्ये सादर करण्याचे निर्देश प्रांताधिकारी खाडे यांना दिले. या वेळी त्यांच्यासमवेत खासदार राऊत, आमदार राजन साळवी, सेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने, प्रांताधिकारी प्रवीण खाडे उपस्थित होते. 

काय आहे प्रकरण? 

गोवळ वरचीवाडी येथील जमीन शासनाने अतिरिक्त जमीन म्हणून अधिग्रहण केली होती. पुन्हा तीच जमीन एका आदेशानुसार मूळ मालकाला परत केली होती. मात्र, त्याच्या नोंदी नजरचुकीने सातबारा सदरी घातल्या गेल्या नव्हत्या. या प्रकरणी राजापूर तहसीलदार यांनी हा सातबारा मूळ स्थितीत आणून ठेवण्याचे आदेश दिले होते. हा फेरफार अवलोकनासाठी प्रांताधिकारी राजापूर यांच्याकडे पाठविला होता. त्यावर निर्णय देताना प्रांताधिकारी राजापूर यांनी सदर फेरफार अंशत: रद्द करत संबंधित सात सातबारा बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याच बंद करण्यात आलेल्या सातबारांवरील जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com