
कोकणात रोजगार यासाठी रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्ह्यात इनोव्हेशन पार्क निर्मिती केली जाणार आहे, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.
रत्नागिरी : नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधावरील भूमिकेवर शिवसेना ठाम आहे. राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या पत्रावर मी काहीही मत व्यक्त करणार नाही; परंतु कोकणात रोजगार यासाठी रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्ह्यात इनोव्हेशन पार्क निर्मिती केली जाणार आहे, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.
नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पासंदर्भात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. त्या विषयी रविवारी रत्नागिरीत पत्रकारांनी मंत्री सामंत यांना विचारले असता, ते म्हणाले, राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत. लोकशाहीने त्यांना अधिकार दिला आहे. एका पक्षाच्या प्रमुखांनी पत्र लिहले तरी शिवसेनेची भूमिका निश्चित आहे. लोकांच्या विरोधामुळेच शिवसेनेने हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मनसेने आता त्यांची भूमिका मांडली आहे. रिफायनरी समर्थकांनी देखील माझी भेट घेतली. त्यांनी सांगितले की, या जागेचा उपयोग तेथील लोकांना रोजगार निर्मितीसाठी झाला पाहिजे. त्याचाच एक भाग म्हणून देशातील एक मोठे इनोव्हेशन पार्क कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत आहे. रायगड जिल्ह्यात केमिकल झोन असल्यामुळे तिथे केमिकल इंडस्ट्री येईल. रत्नागिरी जिल्ह्यात उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत काही प्रकल्प राबविले जातील. सिंधूदुर्ग जिल्ह्यात पर्यटनावर आधारित प्रकल्प येतील. या माध्यमातून कोकणातील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होतील. मात्र, नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे.
ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडली
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी पक्षप्रमुख असताना जी भूमिका घेतली, तीच भूमिका मुख्यमंत्री झाल्यावरही कायम आहे. तरी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जे पत्र लिहिले आहे. त्या बद्द्ल मी काही बोलणार नाही. त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.