
सिंधुदुर्गची तटबंदी रोषणाईने उजळणार
मालवण: मालवणात प्रत्येक वर्षी पर्यटन महोत्सव आयोजित करून मालवणचे नाव राज्यात पोहोचविले जाईल, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी आज येथे केले.दरम्यान, पर्यटनाचा मानबिंदू असलेल्या किल्ले सिंधुदुर्ग पर्यटकांना रात्रीच्या वेळीही पाहता यावा, यासाठी तटबंदीवर लायटिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी निधीही मंजूर झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
किल्ले सिंधुदुर्ग व अथांग समुद्राच्या साक्षीने येथील दांडी बीच येथे पालिका व जिल्हा नियोजन समितीतर्फे आयोजित ‘जल्लोष २०२२’ पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन श्री. नाईक यांच्या हस्ते झाले. मुख्याधिकारी संतोष जिरगे, शिवसेना नेते संदेश पारकर उपस्थित होते. तहसीलदार अजय पाटणे, जिल्हा बँक संचालक मेघनाद धुरी, चित्रपट अभिनेते दिगंबर नाईक, विजय पाटकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर आदी उपस्थित होते.
आमदार नाईक म्हणाले, ‘पालिका व जिल्हा नियोजन यांच्या माध्यमातून पर्यटन महोत्सव घेतला गेला असला तरी पालिकेकडून एक रुपयाचा निधी घेतलेला नाही. कोरोना काळात येथील पर्यटन ठप्प पडल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. गेल्या काही महिन्यांत येथे मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. किल्ले सिंधुदुर्गवर लायटिंगची व्यवस्था व्हावी, अशी सातत्याने मागणी होत होती. ही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून पूर्ण होत असून, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. लवकरच हे काम मार्गी लावले जाईल. यामुळे रात्रीही पर्यटकांना बंदर जेटीवरून किल्ल्याचे विलोभनीय दर्शन घेता येणार आहे. याशिवाय शहरात मत्स्यालय साकारले जाणार आहे.’
ते म्हणाले, ‘जिल्ह्यातील किनारे पर्यटकांना आकर्षित करतात. त्यामुळे किनारे स्वच्छ राहावेत यासाठी राज्यात प्रथम मालवणसाठी पहिले मशीन उपलब्ध करून देणार आहे. दरवर्षी पर्यटन महोत्सव आयोजित करून मालवणचे नाव राज्यात पर्यटनाच्या दृष्टीने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार आहे.’
यावेळी संतोष जिरगे, दिगंबर नाईक, विजय पाटकर, संदेश पारकर, महेश कांदळगावकर यांनी आयोजनाबाबत कौतुक केले. महोत्सवानिमित्त दांडी बीच बहरले आहे. पर्यटक व मालवणमधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आज नौका सजावट स्पर्धा, वाळू शिल्प कलाकृती, सायकल रॅली, मालवणी खाद्यपदार्थ व पाककला स्पर्धा, ‘आमदार वैभव नाईक श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा, गायन स्पर्धा, स्थानिक दशावतार (महिला व पुरुष) असे विविध कार्यक्रम झाले. इंडियन आयडॉल फेम रोहित राऊत यांच्या सुरेल आवाजात बहारदार गाण्यांचा कार्यक्रम रात्री झाला.
उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे, तालुका प्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी, यतिन खोत, पंकज सादये, नितीन वाळके, बाबी जोगी, अतुल मालणकर, माजी नगरसेविका सेजल परब, आकांक्षा शिरपुटे, शीला गिरकर, तृप्ती मयेकर, दर्शना कासवकर, सुनीता जाधव, दीपा शिंदे, पूनम चव्हाण, शिल्पा खोत, श्वेता सावंत, संमेश परब, किरण वाळके, यशवंत गावकर, गौरव वेर्लेकर, किसन मांजरेकर, युवा सेना तालुका प्रमुख मंदार गावडे, मंदार ओरसकर, अक्षय रेवंडकर, सिद्धेश मांजरेकर, प्रसाद आडवणकर, मनोज मोंडकर, जयदेव लोणे, तपस्वी मयेकर, नरेश हुले, उमेश मांजरेकर, रवी तळाशीलकर, स्वप्निल आचरेकर, बाळू नाटेकर, भाई साटम आदींसह मोठ्या नागरिक व पर्यटक उपस्थित होते.
Web Title: Tourism Festival Inaugurated Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..