देवगड तालुक्यात बहरले पर्यटन

Tourism flourished in Devgad taluka
Tourism flourished in Devgad taluka

देवगड (सिंधुदुर्ग) - कोरोना आणि त्याअनुषंगाने झालेले लॉकडाउननंतर आता स्थानिक पर्यटन बहरण्याची चिन्हे आहेत. आता मंदिरेही खुली झाली आहेत. त्यामुळे सध्याच्या सुटीच्या काळात तालुक्‍यातील विविध ठिकाणच्या पर्यटनस्थळांवर पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. पुन्हा एकदा कोकणच्या मासळीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची हॉटेलना पसंती असल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे मार्चपासून लॉकडाउन झाले होते. त्यामुळे सर्वच व्यवसायांना मर्यादा आल्या होत्या. त्यातच पर्यटन हंगामही काहीसा अडचणीत सापडला होता.

पर्यटनस्थळेही सुनीसुनी झाली होती. त्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या पूरक व्यवसायानाही काहीशा मर्यादा आल्या होत्या. आता मात्र राज्यात टप्याटप्याने लॉकडाउन शिथील करण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार कोरोना काळात बंद असलेली मंदिरेही उघडण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक महिन्यापासून घर आणि परिसरात वावर असलेल्या मंडळींनी आता कोकणकडे धाव घेतल्याचे चित्र आहे. यंदा उन्हाळी हंगामातील पर्यटन झाले नव्हते. अनेकांना कोरोनामुळे घरात थांबण्याची वेळ होती. त्यामुळे इच्छा असूनही अनेकांना मनमोकळेपणाने आंबा, काजूचा आस्वाद घेता आला नाही. ताज्या मासळीचा स्वाद चाखता आला नाही.

पर्यटन स्थळावर बागडता आले नव्हते. त्यातच पावसाळी हंगामातील वर्षा पर्यटनही झाले नव्हते. धबधबे एकांतात गर्दीविना कोसळत होते. त्यानांही लॉकडाउनची सवय झाली असावी. त्यामुळे पर्यटकांच्या इतके महिने दाबून ठेवलेल्या पर्यटनाच्या भावना आता खुल्या होताना दिसत आहेत. तालुक्‍यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर, देवगड समुद्रकिनारा, विजयदुर्ग परिसर या भागात पर्यटकांची वर्दळ जाणवू लागली आहे. सायंकाळच्यावेळी येथील समुद्रकिनारा गर्दीने फुलून गेलेला असतो. मनसोक्‍त पाण्यात डुंबण्याचा आनंद अनेक पर्यटक घेताना दिसतात. स्थानिक हॉटेलमध्ये गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनानंतरची पर्यटनस्थळे पहाण्यासाठी पर्यटकांची आतुरता वाढल्याचे चित्र आहे. 

व्यवसायाला बळ 
कोरोनाच्या भितीचे सावट असले तरीही आता पर्यटकांचा पर्यटनस्थळांवर मुक्‍त वावर सुरू झाला आहे. आवश्‍यक काळजी घेत पर्यटक विविध पर्यटनस्थळांना भेटी देत आहेत. यातून स्थानिक व्यवसायाला बळ येण्याची शक्‍यता आहे. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com