esakal | Good News - कातळशिल्पांमुळे जागतिक पर्यटक कोकणात

बोलून बातमी शोधा

Good News - कातळशिल्पांमुळे जागतिक पर्यटक कोकणात
Good News - कातळशिल्पांमुळे जागतिक पर्यटक कोकणात
sakal_logo
By
मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : कोकणात पाहण्यासारखे बरेच काही आहे. पर्यटक येथे वास्तव्याला न थांबता थेट गोवा गाठतो. तो पर्यटक रत्नागिरी, सिंधुुदुर्ग जिल्ह्यात वास्तव्याला येण्यासाठी कातळशिल्प पर्यटन महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत कातळशिल्प पर्यटनाला गती मिळाली असून, आतापर्यंत देश-विदेशातील सुमारे ४० हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. मानांकन मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय पर्यटनाला गती मिळेल आणि त्याचा उपयोग स्थानिकांच्या रोजगारनिर्मितीमध्ये होईल, असा विश्‍वास कातळशिल्प शोधकर्ते सुधीर रिसबूड यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

ते म्हणाले, ‘‘भौगोलिक, नैसर्गिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना देणारी ही शिल्पे आहेत. वारसास्थळे हे जगभरातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते. कातळ शिल्पांमुळे जगभरातील पर्यटक या ठिकाणी येऊ शकतील. त्याचा सर्वांगीण लाभ स्थानिक क्षेत्राला होऊ शकतो. कोकणातील एकंदर वारसास्थळ पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल. कातळशिल्पे ही सड्यांवर असून, त्या माध्यमातून ग्रामीण पर्यटन विकासाला चालना मिळेल.’’

स्थानिक खाद्य आणि कला संस्कृतीला उत्तेजन मिळून त्यातून रोजगार निर्माण होईल. वेगवेगळ्या ठिकाणी शिल्पे असल्याने स्थानिक वाहतूकदारांना व्यवसाय मिळेल. होम स्टे, शेती पर्यटनाला पूरक जोड जल पर्यटन, साहसी खेळ यांना उत्तेजन, लहान-मोठे पर्यटनपूरक व्यवसाय ग्रामीण भागात निर्माण होऊ शकतील. सर्व कातळशिल्प रचनांची ठिकाणे उंच सड्यांवर आहेत. खुले आकाशदर्शनासाठी अगदी आदर्श अशा या जागा आहेत. त्याचा फायदा खगोल पर्यटनाला होईल.

(क्रमशः)

वारसा पर्यटन, निसर्ग पर्यटन करणारा पर्यटक हा अधिक काळ मुक्काम करतो आणि अधिक खर्चही करतो, हे जागतिक निरीक्षण आहे. स्वाभाविकच कातळखोद चित्र पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतील, असा विश्‍वास सुधीर रिसबुड यांनी व्यक्त केला.

रिडबूड यांच्या मते...

  • स्थानिक आर्थिक बाबींना मिळेल मोठी चालना

  • विदेशी चलन आपल्या देशात येऊ शकेल

  • पर्यायाने राज्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढणार

  • पर्यावरणाचे नकळत संरक्षण होण्यास होईल मदत