सलग सुट्यांमुळे देवगडात पर्यटन बहरले

संतोष कुळकर्णी
Tuesday, 1 December 2020

शनिवार, रविवार तसेच आज सोमवार असे सलग तीन दिवस शासकीय कार्यालये तसेच बॅंकाना सुटी होती. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रसह मुंबई परिसरातील अनेकांनी कोकणच्या पर्यटनाचा बेत आखल्याचे दिसत होते.

देवगड (सिंधुदुर्ग) - सलग आलेल्या शासकीय तसेच बॅंकाच्या सुट्यांमुळे तालुक्‍यातील पर्यटनस्थळे गजबजली होती. समुद्रकिनारे गर्दीने फुलून गेले होते. श्री क्षेत्र कुणकेश्‍वर येथेही मोठी वर्दळ जाणवत होती. आज सायंकाळपासून पर्यटक परतीच्या मार्गावर असल्याचे चित्र होते. 

शनिवार, रविवार तसेच आज सोमवार असे सलग तीन दिवस शासकीय कार्यालये तसेच बॅंकाना सुटी होती. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रसह मुंबई परिसरातील अनेकांनी कोकणच्या पर्यटनाचा बेत आखल्याचे दिसत होते. तालुक्‍यातील तांबळडेगपासून विजयदुर्गपर्यंत समुद्रकिनारपट्टी भागात सध्या पर्यटकांची मोठी वर्दळ जाणवत होती. कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने यंदाचे उन्हाळी तसेच पावसाळी पर्यटन होऊ शकले नाही. मात्र राज्यात सध्या अनलॉकची प्रक्रीया सुरू असल्याने अनेकांनी कोकण भ्रंमतीचे बेत आखल्याचे दिसत होते.

गेले तीन दिवस सलग सुट्टी आल्याने त्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची समुद्रकिनारी धांदल दिसत होती. तालुक्‍यातील विविध ठिकाणचे समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले होते. श्री क्षेत्र कुणकेश्‍वर येथेही पर्यटकांची मोठी वर्दळ पहावसास मिळत होती. विजयदुर्ग येथेही पर्यटकांची जे-जा सुरू होती. विविध हॉटेलमध्ये पर्यटकांची वर्दळ दिसत होती. निवास न्याहारी तसेच हॉटेल व्यवसायिकांना लॉकडाउननंतर काहीसे सुखावणारे चित्र निर्माण झाले होते. खासगी वाहने घेऊन पर्यटक येत असल्याने सागरी महामार्गावरील वर्दळीत मोठी वाढ झाली होती. 

व्यावसायिकांना उभारी 
कोरोनामुळे थांबलेले पर्यटन आता पुन्हा बहरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. येत्या वर्षअखेरीसही तालुक्‍यातील पर्यटन वाढण्याची शक्‍यता आहे. सध्याच्या पर्यटकांच्या वर्दळीमुळे व्यावसायिकांच्या दृष्टीने काहीसे आशावादी चित्र निर्माण झाले आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourism increased Devgad taluka