सुनीसुनी पर्यटनस्थळे लागली खुणावू, व्यावसायिकांचे काय मत? वाचा

भूषण आरोसकर
Tuesday, 1 September 2020

कोरोनाने अनेकांवर उपासमारीची वेळ आणली. अनेकांचे रोजगार हिरावले गेले. पर्यटनस्थळांनाही याचा फटका बसल्याने जिल्ह्यातील आंबोलीचाही पर्यटन हंगाम सुनासुना गेला.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - वर्षा ऋतूच्या शेवटच्या टप्प्याला सुरुवात झाली आहे; मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वर्षा पर्यटनाला बंदी कायम आहे. आंबोलीच्या निसर्ग सौंदर्याचे दर्शन आणि धबधब्याखाली मौजमजा करण्यासाठी पर्यटकांना या हंगामातील शेवटच्या काळात पर्यटन व्यवसायाची दालने खुली झाल्यास त्याचा थोडाफार फायदा व्यावसायिकांना होऊ शकतो. याचा विचार करून शासनाने सुरक्षित अंतर ठेवून पर्यटनाला चालना द्यावी, अशी मागणी केली जात आहे. माझा पर्यटक कुठे आहे? अशी जणू हाक देऊन सुनीसुनी झालेली आंबोलीतील पर्यटनस्थळे पर्यटकांना खुणावू लागली आहेत. 

कोरोनाने अनेकांवर उपासमारीची वेळ आणली. अनेकांचे रोजगार हिरावले गेले. पर्यटनस्थळांनाही याचा फटका बसल्याने जिल्ह्यातील आंबोलीचाही पर्यटन हंगाम सुनासुना गेला. परिणामी आंबोलीचे अनेक पर्यटन व्यावसायिक आर्थिक चिंतेत सापडले. पावसाळी हंगामातील पर्यटन व्यवसायाचा प्रमुख केंद्र आंबोली बनले आहे. पावसाळी हंगामातील धबधबे, धुके, पाऊस, निसर्ग सौंदर्य असे विविधांगी पर्यटनाचे अनुभव घेण्यासाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात रमण्यासाठी लोक पावसाळी पर्यटनाला दाद देतात.

दक्षिण कोकणचे प्रती महाबळेश्‍वर म्हणून आंबोली प्रसिद्ध आहे. या ठिकाणी राज्यासह गोवा, कर्नाटक आणि अन्य राज्यातून देखील पर्यटक येत असतात; परंतु यंदाच्या हंगामात कोरोना संकट आल्यामुळे पर्यटकाना हंगाम बंद ठेवाव लागला. आंबोलीच्या धबधब्यांनी मोकळा श्‍वास मात्र घेतला. दरवर्षी गजबजलेली आंबोली मात्र यंदा जणू सुनीसुनी भासत आहे. 
मुख्य व अन्य धबधब्याखाली मौजमजा करणाऱ्या तरुणाईची आंबोलीत फिरण्याची संधी हुकली असली तरी धबधबे मात्र सुनेसुने झाले आहेत.

आंबोलीच्या निसर्ग सौंदर्याचे आणि पावसाळी पर्यटनाचे वेध अनेकांना लागले होते; परंतु कोरोनाचे संकट पर्यटकांना घरात बसायला लावणारे ठरले आहे. यामुळे आंबोलीचे हॉटेल व्यवसायिक चिंतेत सापडले आहेत. आता कोरोनाचे संकट वाढत असले तरी आंबोलीचा पर्यटन व्यवसाय खुला व्हावा, अशी मागणी जोर धरत आहे. 

गेल्या मार्चपासून आंबोलीच्या व्यावसायिक कोरोना कधी जाणार? या प्रतीक्षेत आहेत. ही प्रतीक्षा सुरू असतानाच आता अर्थशक्ती नसल्याने ते आणखीनच चिंताग्रस्त बनले आहेत. त्यामुळे पर्यटन व्यवसायाची दालने खुली झाल्यास त्यांना अर्थशक्ती वाढवण्याची संधी लाभेल, अशी धारणा आंबोली व्यवसायिकांची आहे. आंबोलीचे निसर्गसौंदर्य, धबधबे पर्यटकांची वाट पाहत आहेत. आंबोलीत वर्षा पर्यटनासह इतर हंगामातही पर्यटक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात.

गेले 5 महिने पर्यटकांशिवाय असलेली आंबोली आता पर्यटकांच्या आशेने खुणावू लागली आहे. तशी आंबोलीवासीयांची धारणाही झाली आहे. आता कोरोनाचा प्रभाव असाच राहिल्यास हॉटेल व्यावसायिकांनी काय करावे? असा मोठा ज्वलंत प्रश्‍नही उभा ठाकला आहे. या संकटामुळे आणखी लोकांना वेठीस धरल्यास आर्थिक संकट निर्माण होईल, अशी भीती आहे. त्यामुळे यावर तोडगा काढून पर्यटन हंगाम सुरू करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. सोशल डिस्टनगसिंगसह अन्य काही उपाययोजना यावर अंमलात आणता येऊ शकतात का? याचाही विचार सरकारकडून अपेक्षित आहे. 

आंबोलीत पर्यटन सुरू केल्यास काहीसा दिलासा लहान व्यवसायिकांना मिळेल; मात्र कोरोनाबाबत खबरदारी तितकीच महत्त्वाची. येथील पर्यटन सुरू झाल्यास निसर्गप्रेमी पर्यटकांसह सर्व प्रकारच्या पर्यटकांना येथील पर्यटनाचा लाभ घेता येईल. आंबोली जैवविविधतेचे ठिकाण असल्याने कोरोना काळातील 5 महिन्यातील लॉकडाउनमधील खरा तणाव मुक्तीचा "आंबोली पर्यटन' पर्याय देखील ठरेल. खबरदारी घेऊन साहसी पर्यटन, नैसर्गिक पर्यटन, मेडिटेशन व योगा, कृषी पर्यटन, व्हिलेज पर्यटनाला प्राधान्य देणार आहोत. करोना काळातही शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन पर्यटन सुरू करण्यास तयार असून शासनाने त्या दृष्टीने सहकार्य करावे. 
- निर्णय राऊत, संस्थापक, आंबोली टुरिझम 

आंबोली परिसरातील पर्यटन व्यवसाय सुरू होणे, सध्याची परिस्थिती बघता गरजेचे आहे. आमच्यासारख्या येथील सर्व व्यवसायिकांचे व्यवसाय कर्जे काढून सुरू केले आहेत. आता कर्जाचे हप्ते व कुटुंबाच्या गरजा या तणावात आम्ही असून लवकरच पर्यटन व्यवसाय सुरू करावा. निदान घर चालवण्यास येथील लहान-मोठ्या व्यावसायिकांना आधार मिळेल. 
- दीपक मेस्त्री, पर्यटन व्यावसायिक 

आंबोलीतील सर्वच हॉटेल्स ही जिल्हा बॅंक व इतर खाजगी बॅंकांकडून कर्जे काढून सुरू केली आहेत. गेल्या वर्षी आणि यंदाचा पर्यटन हंगाम वाया गेला आहे. पुढे व्यवसाय किती प्रमाणात सुरू होईल, याची शाश्‍वती नाही. त्यामुळे येथील पर्यटन सुरू करावे. शासनाने आम्हाला पर्यटन व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी सर्वांना आर्थिक मदत देखील करावी. 
- जीजी राऊत, हॉटेल्स व्यावसायिक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourist destination issue konkan sindhudurg