फुकेरीतील तरुणाईने ठरविले; अन्‌ पर्यटन बहरले

फुकेरीतील तरुणाईने ठरविले; अन्‌ पर्यटन बहरले

फुकेरी - गावातली तरुणाई जेव्हा विकासाला ताकद लावते, तेव्हा दगडालाही पाझर फुटू शकतो, याचीच प्रचीती ऐतिहासिक संदर्भ असलेल्या निसर्गसंपन्न; पण दुर्गम भागातील फुकेरी गावात आली. तरुणाईने ठरविले आणि इथल्या पर्यटनाला पाय फुटले. रानावनात बागडण्यासाठी, ट्रेकिंगचा थरार अनुभवण्यासाठी शेकडो पर्यटकांची पावले या गावाकडे वळली.

फुकेरी हे दोडामार्ग-सावंतवाडी तालुक्‍यांच्या सीमेवर सह्याद्रीच्या उंच रांगात वसलेले गाव. भन्नाट वारा, मुसळधार पाऊस, बेधुंद करणारी  धुक्‍याची चादर आणि नजर टाकावी तिथे उंचच उंच हिरव्यागार डोंगर रांगानी वेढलेले गाव. याला ऐतिहासिक संदर्भही आहेत. या गावच्या वरच्या बाजूला हनुमंत गड आहे.

सावंतवाडी संस्थानच्या इतिहासात या गडाचे विशेष महत्त्व आहे. उंचावर असल्याने थंडगार वारा, मुसळधार पावसाची साथ असते. चौकूळच्या पायथ्याशी असलेल्या या गावात चौकूळ-आंबोली सारखेच निसर्गसंपन्न वातावरण असले तरी मुख्य शहरे, महामार्गापासून दूर असल्याने दुर्गमतेचा शिक्‍का येथे वर्षानुवर्षे मारलेला आहे.

फुकेरीचा हनुमंत गड आणि गावकऱ्यांचे अढळ नाते आहे. येथील रहिवासी मुळचे गडावरचे गडकरी होते. नंतर ते फुकेरीत आले, असे सांगितले जाते. दुर्गम असल्याने येथे सोयीसुविधांची वानवा. प्रचंड वारा असल्याने शेती-बागायती करायलाही मर्यादा. यामुळे इथले तरुण रोजगारासाठी गोव्यात स्थलांतरित होतात. तिथे वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरावले तरी त्यांचे गावाशी असलेले नाते मात्र घट्ट आहे. गावचे दैवत असलेल्या श्री वैजमाऊली देवीच्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची हजेरी असते.

गावचा विकास व्हावा, या ध्येयाने झपाटलेल्या काही तरुणांनी पर्यटन विकासासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले. गावात पर्यटनाला पोषक सर्व घटक असले तरी पर्यटक येथे आणणे सोपे नव्हते. गेल्या वर्षी पहिल्यांदा वर्षा पर्यटनाची संकल्पना या तरुणांनी गावच्या नवयुवक मंडळाच्या छत्राखाली राबवली.

फेसबुक, ट्विटर, इस्टाग्राम आदी सोशल साईटच्या माध्यमातून निसर्गरम्य फुकेरी लोकांपर्यंत पोचवली. ट्रेकिंगसाठी निमंत्रित केले. याला गोव्यातील पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
यंदा रविवारी (ता. २८) ट्रेकिंगचा मोठा इव्हेंट या तरुणांनी आयोजित केला. माफक शुल्क घेऊन पर्यटकांना हनुमंत गड, इथल्या रानवाटा, छोटे धबधबे, मुसळधार पावसाच्या जोडीला ट्रेकिंगची सोय केली. शुद्ध शाकाहारी जेवण-नाष्टा देऊन सात्वीक पर्यटनाचाही धडा घालून दिला. त्यालाही सोशल मीडियावर प्रसिद्धी दिली. गोव्यात राहणाऱ्यांनी आपल्या संपर्कातील हौशी पर्यटकांना निमंत्रित केले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सुमारे २००च्या घरात गोव्यातील पर्यटक फुकेरीत दाखल झाले. इथल्या रानवाटांवर मनसोक्‍त भटकले. हनुमंत गडावर जात ट्रेकिंगचा आनंदही घेतला. ठिकठिकाणी वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या ओहोळात मनोसोक्‍त डुंबले. सह्याद्रीच्या कुशीतील समृद्ध आयुष्य अनुभवले.

सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा झाल्यापासून विकासाच्या केवळ गप्पा सुरू आहेत. किनारपट्टीकडे समुद्राच्या आकर्षनामुळे पर्यटक आपोआप येत आहेत; मात्र सह्याद्रीच्या रांगामध्ये क्षमता असूनही पर्यटन विकासासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. या परीस्थितीत फुकेरीतील तरुणांनी स्वयंस्फूर्तीने केलेले प्रयत्न आभाळा एवढे मोठे आहेत. यंदा वाढलेल्या प्रतिसादाने फुकेरीतील तरुणांची उमेद कित्येक पटीने वाढली आहे.

कसे जाल फुकेरीत?
फुकेरी येथे जाण्यासाठी दोडामार्ग आणि बांदा, अशा दोन्ही मार्गांनी पोचता येते. बांदा-झोळंबेमार्गे फुकेरी हे अंतर २० किलोमीटर आहे. दोडामार्गहून यायचे झाल्यास सासोली तिठा किंवा कळणेहून कोलझर-तळकटमार्गे अंतर साधारण ३० किलोमीटर आहे. फुकेरी गावापर्यंत डांबरी रस्ता गेला आहे.

फुकेरी येथे पर्यटनाच्या दृष्टीने प्रचंड मोठी क्षमता आहे. याला दिशा देण्याचा गावातील तरुणांनी एकत्र येत प्रयत्न केला. याला चांगला प्रतिसाद मिळाला. पुढच्या काळात येथे नक्‍की पर्यटन बहरेल, अशी खात्री आहे.
- साबाजी आईर,
ग्रामस्थ, फुकेरी

फुकेरी येथे साहसी पर्यटन, निसर्ग पर्यटन, वर्षा पर्यटन विकसित करणे शक्‍य आहे. येथे सोयी-सुविधा निर्माण करायला हव्यात. यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करायला हवेत.
- ज्ञानेश्‍वर आईर,
ग्रामस्थ, फुकेरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com