esakal | रत्नागिरीतील सागरी मार्गावरील पर्यटन स्थळे कोरोनामुळे सुनीसुनी
sakal

बोलून बातमी शोधा

Tourist Spots On Sea Route In Ratnagiri Close Due To Corona

रत्नागिरी-राजापूर सागरी मार्गावरील गावखडी व पूर्णगड या दोन गावांना जोडणारा मुचकुंदी खाडीवरील सागरी मार्गावरील पूल झाल्यामुळे अनेकांना हा मार्ग सोयीस्कर ठरला आहे.

रत्नागिरीतील सागरी मार्गावरील पर्यटन स्थळे कोरोनामुळे सुनीसुनी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पावस ( रत्नागिरी) - रत्नागिरी तालुक्‍यातील गावखडी येथील निसर्गरम्य परिसर, सुंदर समुद्र किनारा, सुरुबन, पूर्णगड किल्ला आणि गावखडी व पूर्णगड या दोन गावांना जोडणारा सागरी मार्गावरील खाडी पूल पर्यटकांना आकर्षित करणारा आहे; मात्र कोरोनामुळे येथील पर्यटन स्थळे सुनीसुनी झाली आहेत. स्थानिक लोक वगळता या किनाऱ्यावर, किल्ल्यावर कोणीही दिसत नाही. 

रत्नागिरी-राजापूर सागरी मार्गावरील गावखडी व पूर्णगड या दोन गावांना जोडणारा मुचकुंदी खाडीवरील सागरी मार्गावरील पूल झाल्यामुळे अनेकांना हा मार्ग सोयीस्कर ठरला आहे. त्यामुळे कोकणामध्ये उतरणारे अनेक पर्यटक गणपतीपुळे येथे आल्यानंतर सागरी मार्गाने रत्नागिरीहून पावस, गणेशगुळे या भागांना भेट दिल्यानंतर पूर्णगड किल्ल्याला भेट देतात. खाडी पूल झाल्यामुळे थेट राजापूरपर्यंत सागरी मार्गाच्या माध्यमातून समुद्राचा आस्वाद पर्यटकांना घेता येतो. त्यामुळे गावखडी गावाला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे.

या गावाला निसर्गाची देणगी लाभली असून गावामध्ये स्वयंभू रामेश्‍वर देवस्थान आहे. त्याचबरोबर सागरी मार्गाला लागूनच समुद्र किनारा, सुरुबन, गाड्या पार्किंगची चांगली सोय, कासव संवर्धन केंद्र आदींमुळे पर्यटकांसाठी हे हॉट डेस्टिनेशन ठरत आहे. त्यामुळे पावसमार्गे राजापूरला जाणारा पर्यटक आनंद लुटण्यासाठी गावखडी किनाऱ्यावर थांबतोच; मात्र कोरोनाचे सावट असल्यामुळे गेले सहा महिने पर्यटकांना फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. या परिस्थितीत किनाऱ्यावर कोणी फिरकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थानिक लोकांचा रोजगार बुडाला आहे. 

पोलिसांचीही गस्त 
कोरोनामुळे समूहाने फिरण्यास बंदी असल्याने पूर्णगड सागरी पोलिसांची गस्त या परिसरात सुरू असते. तसेच रुग्ण सापडल्याने अनेकजण समुद्रकिनाऱ्यावर जाताना सावधानता बाळगत असल्याचे चित्र आहे. 

दृष्टिक्षेपात... 

  • सागरी मार्गाला लागूनच पर्यटनस्थळे 
  • गावखडी किनारा करतो आकृष्ट 
  • समूहाने फिरण्यास बंदी, पोलिसांची गस्त.