रायगड : उन्हाळी सुट्टीत जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पर्यटकांनी बहरली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tourist
रायगड : उन्हाळी सुट्टीत जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पर्यटकांनी बहरली

रायगड : उन्हाळी सुट्टीत जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पर्यटकांनी बहरली

पाली - जिल्ह्यातील विस्तीर्ण 240 किमीचा समुद्र किनारा, प्रसिद्ध किल्ले, ऐतिहासिक व धार्मिक स्थळे व निसर्ग सौंदर्य यामुळे रायगड जिल्ह्याला पर्यटकांची नेहमीच पसंती असते. परिणामी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये येथील पर्यटनस्थळे हाऊसफुल झाली आहेत. मात्र उष्मा वाढल्याने समुद्र किनाऱ्यांना पर्यटकांची अधिक पसंती आहे. एसी रुमना अधिक जास्त मागणी आहे. राहण्या खाण्याच्या किंमती 20 ते 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. पुणे-मुंबईसह महाराष्ट्र व राज्याबाहेरील निरनिराळ्या ठिकाणच्या पर्यटकांची पावले जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे वळली आहेत. सर्व ठिकाणी पर्यटकांची गर्दी आहे. यामुळे पर्यटनावर अवलंबुन असलेले हॉटेल व्यावसायिक, खानावळी, छोटे-मोठे दुकानदार, वाहतूकदार, राईड्सवाले यांची सध्या चलती आहे.

अलिबाग- नागाव, वरसोली, मुरुड- काशिद, श्रीवर्धन- दिवेआगर, हरिहरेश्वर येथील समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालत आहे. येथे विविध राईडचा आनंदही ते घेत आहेत. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणुन सर्वत्र परिचित आहे. वाढत्या उन्हाच्या कडाक्यात गारवा घेण्यासाठी माथेरानमध्ये पर्यटकांची रेलचेल पहायला मिळत आहे. आठवड्या भरापासुनच येथील काही हॉटेल व लॉज बुक झाले असले तरी येणार्‍या पर्यटकांची कोणतीच गैरसोय होणार नाही याची काळजी येथील व्यावसायिक घेत आहेत. अष्टविनायकांपैकी दोन गणपती हे रायगडमध्ये आहेत. ते म्हणजे खालापुर तालुक्यातील महडचा वरदविनायक आणि सुधागड तालुक्यातील पालीचा बल्लाळेश्वर, सध्या येथे सकाळी व सायंकाळी भाविकांची दर्शनासाठी रीघ लागलेली आहे. उष्णता अधिक असल्याने रायगड किल्ल्यावर पर्यटक कमी प्रमाणात येत आहेत. समुद्रातील मुरुड जंजिरा व अलिबागचा कुलाबा किल्ला व उरण जवळील घारापुरी/अजंठा लेणी पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. महिनाभरात येथील नगरपालिका, नगरपरिषदा, व ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात पर्यटक करामुळे भरघोस वाढ होण्याची शक्यता आहे.

राहण्या-खाण्याच्या दरात वाढ

या वर्षी हॉटेल व खाणावळीतील जेवणाच्या व राहण्याच्या दरात 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. माथेरानमध्ये एका जोडप्यासाठी एक दिवस-रात्रीसाठी 1200 ते 1800 रुपये साध्या खोलीसाठी तर दोन ते चार हजार एसी रुमसाठी भाडे आहे. अलिबाग व मुरुड तालुक्यात चार व्यक्तींना राहण्याचा दर एक दिवस-रात्रीसाठी साधारण खोली करिता 1500 रुपये तर एसी व टिव्ही असलेल्या खोलीकरीत 2200 ते 4000 पर्यंत आहे. तर हरिहरेश्वर, दिवेआगर व श्रीवर्धन येथे साधारण खोली करीता 1200 ते 1600 तर एसी व टिव्ही असलेल्या खोली करीता 2200 रुपयांपासुन तीन हजार रुपयांच्या पुढे आहे. बहुतांश ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या हॉटल मध्ये राहण्याची व जेवणाची व्यवस्था आहे. ग्राहकांसाठी विविध ऑफर देखील दिल्या जात आहेत.

समुद्र किनार्‍यावर विविध राईड्सची मज्जा

अलिबाग- नागाव, वरसोली, मुरुड- काशिद, श्रीवर्धन- दिवेआगर, हरिहरेश्वर येथील समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालत आहे. हे सर्व समुद्र किनारे पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. किनार्‍यांवर बोटींग, घोडागाडी, बनाना, बाईक राईडची व पॅरा ग्लायडिंगची मजा पर्यटक लुटत आहेत. यांचे दर देखील वाढले आहेत.

सुट्यांमध्ये पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. दर्शनाबरोबर पर्यटक समुद्रकिनारी विविध राईड्सची मजा लुटतात. व्यावसायिकांचा व्यवसाय चांगला होत आहे. शिवाय महसूल देखील वाढत आहे. गर्मी अधिक असल्याने यंदा एसी रुमना अधिक मागणी आहे. विजेचे दर वाढल्याने एसी रुमचे भाडे देखील वाढले आहे.

- अमित खोत, सरपंच, हरिहरेश्वर.

उन्हाची काहिली वाढली असल्याने रायगड किल्ल्यावर दुर्गप्रेमी व पर्यटकांची फारशी गर्दी नाही. त्यामुळे रोपवेची सायंकाळची वेळ वाढविण्यात यावी जेणेकरून ऊन कमी झाल्यावर दुर्गप्रेमी किल्ल्यावर येऊ-जाऊ शकतील. अनेक लोक समुद्र किनाऱ्यांना पसंती देत आहेत.

- अजित औकिरकर, व्यावसायिक, रायगड किल्ला - हिरकणीवाडी.

सुट्टी असल्याने आगाऊ (ऍडव्हान्स) बुकिंग झाले आहे. पर्यटकांना उत्तम सेवा सुविधा देण्यासाठी तयार आहोत. व्यवसाय चांगला होत आहे.

- मनीष पाटील, चालक, माऊ रिसॉर्ट, दिवेआगर.

मुलांना उन्हाळी सुट्टी रायगड सहकुटुंब जिल्ह्यात पर्यटनासाठी आलो आहे. उष्मा असल्याने समुद्र किनाऱ्यावर जाणे पसंत करत आहे. येथे चांगल्या प्रकारे सुविधा व वागणुक मिळत आहे.

- किशोर बटवा, पर्यटक, मुंबई.