भन्नाट! पर्यटकांना गोव्यापेक्षाही मालवण फेव्हरेट

प्रशांत हिंदळेकर
Sunday, 24 January 2021

जिल्ह्यात सर्वाधिक मालवणला पर्यटकांनी जास्त पसंती दिली आहे. हजारोंच्या संख्येने आलेल्या पर्यटकांमुळे हॉटेल व्यवस्थेसह सर्वच व्यवस्थेवर मोठा ताण पडल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. 

मालवण (सिंधुदुर्ग)-  सलग आलेल्या सुटीमुळे मालवणचे पर्यटन बहरून गेले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पर्यटकांमुळे मालवणसह, तारकर्ली, देवबाग किनारपट्टी गजबजली आहे. परिणामी निवासव्यवस्था हाऊसफुल्ल झाली आहे. दुसरीकडे मासळीचे दरही वधारले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक मालवणला पर्यटकांनी जास्त पसंती दिली आहे. हजारोंच्या संख्येने आलेल्या पर्यटकांमुळे हॉटेल व्यवस्थेसह सर्वच व्यवस्थेवर मोठा ताण पडल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. 

कोरोना काळातील ताळेबंदीनंतर शासनाने पर्यटन व्यवसायास परवानगी दिली. त्यामुळे कोरोना काळात घरात बसून कंटाळलेला नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडल्याचे दिसून आले. दिवाळी तसेच ख्रिसमस सुटी व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले होते. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात आर्थिक संकटात सापडलेल्या पर्यटन व्यावसायिकांना काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसून आले. 

येत्या 27 जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर तसेच सलग आलेल्या सुटींमुळे पश्‍चिम महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागातून तसेच अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणात येथे पर्यटक दाखल झाले आहेत. पर्यटकांची जास्त पसंती ही किनारपट्टी भागाकडे असल्याने शहरातील बंदरजेटी, चिवला बीच तसेच वायरी भूतनाथ, दांडी, तारकर्ली, देवबाग किनारपट्टी सध्या पर्यटकांनी गजबजली आहे.

आज बंदरजेटी परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. किल्ले दर्शनासाठी जाणाऱ्या पर्यटकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात येत होता. वाहनतळाची सुविधा नसल्याने पर्यटकांना वाहने किनाऱ्यावर उभी करावी लागत होती. किल्ले दर्शनासह रॉकगार्डन, जयगणेश मंदिर येथेही पर्यटकांकडून भेटी देण्यात येत होत्या. त्यामुळे या भागातील पर्यटन व्यवसाय तेजीत असल्याचे दिसून आले. 
सध्याच्या पर्यटन हंगामात मासळीचे दर गगनाला भिडले आहेत. मासळीचे दर वाढले असले तरी पर्यटकांकडून किंमती मासळीचा मनमुराद आनंद लुटला जात आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण आता कमी होत आहे. यात सुरवातीच्या काळात तहसीलदार, पोलिस निरीक्षक, पालिका प्रशासनाने राबविलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे कोरनाचा प्रादुर्भाव रोखण्यात बऱ्यापैकी यश मिळाले आहे. शिवाय मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला असून येथे येणाऱ्या पर्यटकांकडूनही याचे पालन केले जात असल्याचे दिसून येत आहे. कोरोना काळात राबविलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे आज येथील पर्यटन व्यवसाय बहरत असल्याचे दिसून येत आहे. 

गोव्यापेक्षा मालवणला पसंती 
पर्यटन हंगामात यावर्षी पर्यटकांची गोव्यापेक्षा सिंधुदुर्गला जास्त पसंती असल्याचे दिसून आले. यात गेल्या काही दिवसांत मालवणात आलेल्या हजारो पर्यटकांमुळे मालवणला जास्त पसंती असल्याचे दिसून आले. साहसी जलक्रीडा प्रकार तसेच किल्ला दर्शनासाठी हजारो पर्यटक येथे दाखल झाले आहेत. या पर्यटकांची जास्त पसंती ही किनारपट्टी भागास असल्याचे दिसून आले आहे. 

निवासव्यवस्थ्या हाऊसफुल 
सलग सुट्ट्यांमुळे हजारोंच्या संख्येने येथे दाखल झालेल्या पर्यटकांमुळे शहरासह तारकर्ली, देवबाग तसेच परिसरातील निवासव्यवस्थ्या येत्या 26 तारखेपर्यंत फुल्ल असल्याची माहिती मिळाली आहे. निवासव्यवस्थ्या अपुरी पडल्याने येथील पर्यटनाचा आनंद लुटण्यास आलेल्या पर्यटकांना लगतच्या कुडाळ, कणकवली, सावंतवाडी येथे आपल्या वास्तव्याची व्यवस्था करावी लागत आहे. 

हॉटेल व्यवस्थेवर मोठा ताण 
कोरोना काळानंतर पर्यटन व्यवसाय सुरू झाला; मात्र पर्यटन व्यावसायिकांकडून ज्या क्षमतेने व्यवस्था उभारणे गरजेचे होते त्यात बऱ्याच अडचणी आल्या. खानावळी म्हणाव्या त्या प्रमाणात उभ्या राहिल्या नाहीत. परिणामी सध्या अस्तित्वात असलेल्या काही ठराविक हॉटेलमध्ये पर्यटकांची गर्दी होत आहे. सायंकाळी उशिरापर्यंत जेवणावेळी सुरू असल्याने हॉटेल व्यवस्थेवर मोठा ताण पडल्याचे चित्र आहे. 

माशांचे दर असे 
कोळंबी दर 600 रुपये किलो, पापलेट 1000 ते 1400 रुपये किलो, बांगडा 1500 रुपये टोपली, संरगा 550 रुपये किलो, सुरमई 1000 रुपये किलो, मोरी 500 रुपये किलो, खेकडे 500 रुपये किलो दराने उपलब्ध होत होते. मासळी महागल्याने थाळ्यांच्याही दरात वाढ झाली आहे. यात बागंडा थाळी 200 रुपये, सुरमई 350 ते 650 रुपये, पापलेट 450 ते 650 रुपये, कोळंबी 400 रुपये, मोरी 350 रुपये, संरगा 450 ते 550 रुपये, खेकडे 400 रुपये आहे. 

टाळेबंदीनंतर येथील पर्यटन बहरत आहे. यात गोव्यापेक्षा सिंधुदुर्गातील मालवणला पर्यटकांची जास्त पसंती असल्याचे पर्यटकांच्या आलेल्या लोंढ्यावरून सिद्ध होते. पोलिस, तहसील आणि पालिकेने प्रभावी उपोययोजना राबविल्याने कोरोनचा प्रादूर्भाव रोखण्यात यश मिळाले. याचाच चांगला परिणाम या पर्यटन हंगामात हजारोंच्या संख्येने आलेल्या पर्यटकांमुळे दिसून आला. त्याचा फायदा व्यापाऱ्यांना होत आहे. 
- नितीन वाळके, पर्यटन व्यावसायिक 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourists prefer Malvan over Goa