उन्हाळी सुट्टीत पर्यटकांची रायगडला पसंती

अमित गवळे
बुधवार, 22 मे 2019

पाली : उन्हाळी सुट्यांचा पर्यटनासाठी पुरेपूर फायदा घेण्यासाठी पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणचे पर्यटक जिल्ह्यातील पर्यटनस्थळाकडे आले आहेत. जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली आहे.

पाली : उन्हाळी सुट्यांचा पर्यटनासाठी पुरेपूर फायदा घेण्यासाठी पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणचे पर्यटक जिल्ह्यातील पर्यटनस्थळाकडे आले आहेत. जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली आहे.
 
येथील समुद्र किनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तु, किल्ले, तीर्थक्षेत्र पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ वाढत आहे. यामुळे पर्यटनावर अवलंबुन असलेले हॉटेल व लॉज व्यावसायिक, खानावळी, दुकानदार यांची सध्या खूप चलती आहे. राहण्या-खाण्याच्या दरात मागीलवर्षी पेक्षा वाढ झाली आहे. मात्र खराब रस्ते व वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांची गैरसोय होत आहे. राहण्यासाठी साधी रूम 1200 ते 1600 रुपये आणि एसी रूम 2000 ते 2500 प्रति दोन व्यक्ती एक दिवसाचे भाडे आहे. ठिकाणांनुसार त्यात दर कमी जास्त होत आहेत. काही ठिकाणी राहण्याबरोबर खाण्याचीही व्यवस्था होत आहे.
 
समुद्र किनार्‍यांवर गर्दी
जिल्ह्याला विस्तृत आणि मनमोहक समुद्र किनारा लाभला आहे. त्यामध्ये अलिबाग- नागाव, वरसोली, मुरुड- काशिद, श्रीवर्धन- दिवेआगर, हरिहरेश्वर येथील समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालत आहे. हे सर्व समुद्र किनारे पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. सर्वच किनार्‍यांवर पर्यटक बोटींग, घोडागाडी, बाईक राईडची मजा पर्यटक लुटत आहेत. कुटुंबियांसोबत पर्यटकांनी येथे तळ ठोकूण ठेवला आहे. विविध ठिकाणची बुकींग फुल्ल झाली असली तरी देखिल काही हॉटेल व कॉटेजमध्ये एैन वेळी येणार्‍या पर्यटकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे ताजी मासळी खाण्यावर पर्यटक अधिक भर देत आहेत.

माथेरानमध्ये गारव्याची मज्जा
उन्हाचा जोर वाढला असल्याने जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले थंड हवेचे ठिकाण माथेरान पर्यटकांनी बहरले आहे. सर्वसामान्य दिवसांपेक्षा विकेंडला येथे अधिक गर्दी असते. 

अष्टविनायकाचे क्षेत्र पालीचा बल्लाळेश्वर आणि महडच्या वरदविनायकाच्या दारी भक्तांची मांदियाळी
अष्टविनायकांपैकी दोन गणपती हे रायगडमध्ये आहेत. ते म्हणजे खालापुर तालुक्यातील महडचा वरदविनायक आणि सुधागड तालुक्यातील पालीचा बल्लाळेश्वर, सध्या येथे भाविकांची दर्शनासाठी रीघ लागलेली आहे. आलेल्या भक्तांची राहण्याची सोय करण्यासाठी बल्लाळेश्वर देवस्थानच्यावतीने दोन भक्तनिवासामध्ये अतिशय अल्पदरात राहण्याची चांगली व्यवस्था करण्यात येते. भक्तनिवास भरले तरी इतर खाजगी लॉज देखिल उपलब्ध आहेत. अनेक भक्त महडच्या वरदविनायकाचे दर्शन घेऊन पालीच्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येतात. मंदिराच्या आसपास असलेली फुल, हार, नारळ, प्रसाद, पुजेचे साहित्याची दुकाने सजली आहे. त्यांचा व्यवसाय तेजीत आहे.

रायगडाला शिवप्रेमींची पसंती
शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याला शिवप्रेमींची पसंती असते.  मात्र उष्मा वाढल्याने शिवप्रेमींच्या संख्येत अपेक्षेपेक्षा कमी झाली आहे.

 समुद्रातील मुरुड जंजिरा व अलिबागचा कुलाबा किल्ल्यावरही पर्यटकांची आवर्जून भेट
 मुरुड आणि अलिबाग समुद्रकिनार्‍याची मजा लुटतांनाच पर्यटक येथे असलेल्या मुरुड जंजिरा आणि कुलाबा किल्ल्याला आवर्जून भेट देत आहेत. तिथला इतिहास जाणून घेत आहेत. ओहटीच्या वेळी कुलाबा किल्ल्यावर चालत किंवा घोडागाडीने जाता येते. तर भरतीच्यावेळी किल्ल्यावर जाण्यासाठी मोटारबोटची व्यवस्था आहे. जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठीही फेरी बोटींच्या फेर्‍या सुरु असतात. किल्ल्याची माहिती देण्यासाठी गाईडसुद्धा उपलब्ध आहेत. अलिबागला येण्यासाठी मुंबई-गेटवे ऑफ इंडियावरुन मांडवा व रेवस येथपर्यंत थेट प्रवासी लॉंच सेवा उपलब्ध आहे. अवघ्या दिड ते दोन तासांमध्ये अलिबागला येता येते.

हरिहरेश्वरमध्ये पर्यटन आणि अध्यात्माचा सुरेख संगम
दक्षिण काशी म्हणुन ओळखल्या जाणार्‍या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वरला पर्यटकांसह भाविकांचीही पसंती असते. कारण एकाच ठिकाणी भव्यसमुद्र किनारा आणि देवदर्शन अशा दोन्ही गोष्टींचा सुरेख संगम तेथे साधता येतो. महाराष्ट्र पर्यटन विभागाने (एमटीडीसी) येथे पर्यटकांसाठी राहण्याची सोय केली आहे. तसेच खाजगी लॉजसुद्धा उपलब्ध आहेत. तेथुनच दिवेआगर आणि श्रीवर्धनच्या समुद्रकिनार्‍यावर जाता येत. दिव्याआगरला राहण्यासाठी कॉटजची व लॉजची व्यवस्था आहे. 
  
घारापुरी/अजंठाच्या लेण्या पाहण्यासाठी कलाप्रेमींची गर्दी
उरण जवळील घारापुरी/अजंठा लेणी पाहण्यासाठी कलाप्रेमींची गर्दी होत आहे. येथे जाण्यासाठीही उरण व गेटवे ऑफ इंडियावरुन फेरी बोटीची सेवा उपलब्ध आहे.
 
महामार्गावरील हॉटेल व्यवसाय तेजीत
पुणे मुंबई वरून कोकणात जाणारे पर्यटक महामार्गावरील हॉटेलात खाण्या-पिण्यासाठीची थांबतात. त्यामुळे सुट्टीच्या दिवसांत महामार्गावरील हॉटेल व्यवसायिक जय्यत तयारीत आहेत. नाक्यांनाक्यावर खाजगी टुर्सवाले तसेच पर्यटक थांबत आहेत. टॉयलेटची सोय असणाऱ्या हॉटेलला पर्यटक अधिक पसंती देतात. त्यामुळे 

समुद्र किनार्यांना अधिक पसंती
 वाढत्या उष्म्यामुळे किल्ल्यावर यंदा पर्यटकांची गर्दी कमी आहे. मात्र विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेल्या या जिल्ह्यात समुद्रात मनसोक्त डुंबण्याचा आनंद पर्यटक लुटत आहेत. आणि याच ठिकाणी वस्ती करणे पसंत करत आहेत. त्यामुळे त्यांना काही काळ गारवा देखील मिळतो. त्या बरोबर धार्मिक स्थळांवर देखील पर्यटक अधिक आहेत. 
 
''दरवर्षी उन्हाळी सुट्यांमध्ये रायगड जिल्ह्यात पर्यटनासाठी कुटुंबासमवेत येते. येथील सर्वच पर्यटन स्थळे खुपच चांगली आहेत. अलिबाग आणि मुरुड समुद्रकिनारा अधिक आवडतो. तसेच पालीच्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आवर्जून जातो.''
 - संगीता रमेश काकवीपुरे, पर्यटक, भिवंडी
 
''
पर्यटक ऑनलाइन आगाऊ बुकिंग करून येत आहेत. येथे ते समुद्रातील ताजेमासे खाणे पसंत करतात. तसेच कोकणचा रानमेवा देखील ते आवर्जून खातात. जूनच्या दुसऱ्या आठवड्या पर्यंत पर्यटकांची गर्दी राहील. आलेल्या पर्यटकांना योग्य सोइसुविधा देण्याचा प्रयत्न आमचा असतो.''
 - सुशील सावंत, चालक, रिद्धी सिद्धी निवास, श्रीवर्धन
 

 ''भाविक मोठ्या प्रमाणात बल्लाळेश्वरचा दर्शनासाठी येत आहेत. हार, फुले, प्रसाद याबरोबरच लहान मुलांची खेळणी देखील भाविक खरेदी करतात. मे महिन्यात भाविकांची संख्या वाढत असल्याने अधिक माल भरून ठेवतो.''
- मनोज मोरे, व्यावसायिक, बल्लाळेश्वर मंदिर, पाली

 ''उन्हाळी सुट्टीत बल्लाळेश्वरचा दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नाममात्र दरात प्रसादालयामध्ये प्रसाद उपलब्ध आहे. भाविकांना राहण्यासाठी दोन सुसज्ज भक्त निवास आहेत. रांगेत उभे राहण्यासाठी रेलींग व शेड उभारण्यात आली आहे. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य पार्किंग देखील आहे. तेथे मोफत पार्किंगची व्यवस्था आहे. तसेच सुसज्ज स्वच्छता गृह देखील उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही.''
-  अॅड. धनंजय धारप, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourists like Raigad in summer vacation