
राजापूर - वैशिष्ट्यपूर्ण सूर्यमंदिर आणि समुद्रकिनाऱ्याचा पर्यटनदृष्ट्या झालेला विकास आदींमुळे गेल्या काही वर्षांमध्ये राजापूर तालुक्यातील कशेळी गाव पर्यटनस्थळ म्हणून प्रकाशझोतात आले आहे. समुद्र किनारी नव्याने विकसित केलेला सनसेट पॉईंट पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्यातून हौशी पर्यटकांचा ओघ वाढू लागला असून कशेळी येथील देवघळी बीचवरील सनसेट पॉईंटला सध्या ‘टुरिस्ट डेस्टिनेशन’म्हणून पहिली पसंती मिळत आहे.
सह्याद्रीच्या डोंगररांगासह तालुक्याला मोठ्या प्रमाणात समुद्र किनारा लाभला आहे. समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या कशेळीला श्री कनाकादित्य सूर्यमंदिरामुळे धार्मिक अधिष्ठान लाभले आहे. काही मोजक्या सूर्यमंदिरांपैकी हे एक आहे. यात शांत समुद्राची भर पडली आहे. कशेळीच्या सागर तिरावरून समुद्रामध्ये बुडणाऱ्या सूर्यास्ताचे विलोभनीय दृश्य अधिक रोमांचक वाटते. काही वर्षांपूर्वी या किनाऱ्याचा पर्यटनदृष्ट्या विकास झालेला नसल्याने कशेळीकडे पर्यटकांचा फारसा ओढा नव्हता. मात्र, दोन वर्षांपूर्वी पर्यटनदृष्ट्या विकास झाला.
देवघळी बीचवरील सनसेटपॉईंटही चांगल्या पद्धतीने विकसित करण्यात आला. सनसेट पॉईंटला जाण्यासाठी चांगले रस्ते बनविण्यात आले. पथदीप, पर्यटकांसाठी बैठक व्यवस्था आदी सुविधा निर्माण केल्या. येथे काळ्या दगडांवर बसून रौद्ररूप धारण करून फेसाळत, तुषार उडवत किनाऱ्यावर धडकणाऱ्या
लाटांचा अनुभवही सहज घेता येतो. अन्य ठिकाणचे समुद्र किनारे सपाटीवरून पाहण्याची संधी मिळते; मात्र, कशेळी येथील देवघळी बीच उंचावरून पाहणे आनंदमय आहे. कशेळीच्या सनसेंट पॉईंटवरील अनुभूती घेण्यासाठी दरदिवशी शेकडोच्या संख्येने पर्यटक कशेळीला भेटी देतात.
नौकानयनची सफर
रत्नागिरीकडून गोव्याकडे जाणारा सागरी महामार्ग कशेळी येथून जातो. या महामार्गावरील कशेळी बांध येथील दोन डोंगराच्या मधोमध असलेल्या खाडीकिनारा आणि त्यातील जलसाठ्याचा उत्कृष्टरित्या उपयोग करीत गावचे ग्रामस्थ सुधाकर ठाकरे यांनी पर्यटकांसाठी नौकानयन सुविधा निर्माण केली आहे. होडीमधून फेरफटका मारत असताना होडीतूनच सूर्योदय आणि सूर्यास्ताचे डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य अनुभवण्याची संधी मिळते.
सनसेट पॉईंट, देवघळी बीचचे आकर्षण
कशेळी गावाला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला आहे. देवघळी बीच पर्यटकांच्या पसंतीला उतरला आहे. एका बाजूला किनाऱ्यावर समुद्राचे फेसाळत येणाऱ्या पाण्याची गाज तर दुसऱ्या बाजूला उंचच्या उंच सुळक्यासारखे डोंगर यामध्ये स्वच्छ, शांत परिसरामध्ये फिरताना पर्यटक सुखावतो.
पक्ष्यांच्या जलक्रीडाही अनुभवा
कशेळीबांध परिसरात झाडीमध्ये खाडीभागाच्या किनाऱ्यावर विविध जलचरासह देशी-विदेशी पक्ष्यांचे वास्तव्य असते. त्यामध्ये बदक आणि बगळे प्रजातीतील पक्ष्यांचा समावेश आहे. पक्ष्यांच्या शांत पाण्यातील जलक्रीडा अनुभवताना, किलबिलाट आणि हवेतील कसरती पाहताना मनाला आनंद मिळतो. काठावरील मोठमोठ्या झाडांवर सायंकाळी परतीच्या पक्ष्यांचे थवेही पाहायला मिळतात.
कोकणच्या निसर्गसौंदर्याचा कशेळीलाही वारसा लाभला आहे. कनाकादित्य मंदिर, विस्तारलेला समुद्र किनारा, पक्ष्यांचे वास्तव्य अनुभवण्याची सुवर्णसंधी पर्यटकांना मिळते.
- सुयोग ठाकरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.