कृषि विधेयक समर्थनार्थ  सात जानेवारीला 'ट्रॅक्‍टर मोर्चा' 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 December 2020

केंद्रातील भाजप सरकारने आणलेले कृषि विधेयक शेतकरी हिताचे आहे. विधेयकाच्या समर्थनार्थ येत्या 7 जानेवारीला भाजपच्या किसान सेलच्यावतीने कणकवली येथील प्रांत कार्यालयापर्यंत "टॅक्‍टर मोर्चा' काढला जाणार आहे.

देवगड ( सिंधुदुर्ग ) - केंद्रातील भाजप सरकारने आणलेले कृषि विधेयक शेतकरी हिताचे आहे. विधेयकाच्या समर्थनार्थ येत्या 7 जानेवारीला भाजपच्या किसान सेलच्यावतीने कणकवली येथील प्रांत कार्यालयापर्यंत "टॅक्‍टर मोर्चा' काढला जाणार आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार नारायण राणे, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह जिल्हाभरातील शेतकरी यामध्ये सामील होणार असल्याची माहिती आमदार नीतेश राणे यांनी आज येथे पत्रकारांना दिली. 

यावेळी माजी आमदार ऍड. अजित गोगटे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव ओगले, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, लक्ष्मण पाळेकर, माहिला तालुकाध्यक्षा उषःकला केळुसकर, सभापती सुनील पारकर, प्रकाश राणे, आरिफ बगदादी यांच्यासह अन्य उपस्थित होते.

आमदार राणे म्हणाले, ""केंद्राच्या कृषि विधेयकाबद्दल जनतेमध्ये अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. यातील अनेक मुद्दे राज्यात आधीपासूनच लागू असून स्विकारलेले आहेत. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पुस्तकामधून अप्रत्यक्षपणे याच मुद्यांचे समर्थन केले आहे. ज्यांना विधेयक कळले त्यांचा आता त्याला विरोध राहिलेला नाही. यामध्ये कुठेही कृषी उत्पन्न बाजार समिती बंद पडणार नाही; मात्र शेतकरी आपला माल कुठेही विकू शकतात याचे स्वातंत्र्य आहे. लॉकडाउन काळात देवगड हापूस विविध मॉलमध्ये विकला गेला. असंख्य बागायतदारांना याचा लाभ झाला. कृषि विधेयक शेतकरी हिताचे आणि शेतकऱ्यांचे भविष्य घडवणारे आहे. जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी कृषि विधेयकाच्या समर्थनार्थ 7 जानेवारीला टॅक्‍टर मोर्चा काढला जाणार आहे.'' 

आमदार साळवींनी भाजपमध्ये यावे 
कोकणातील जनतेच्या हितासाठी नाणार प्रकल्प आहे. स्थानिकांना प्रकल्प हवा असल्याने आपण त्यांच्यासोबत आहे. आता राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी यांनीही प्रकल्पाचे समर्थन केले आहे. शिवसेनेकडून त्रास होणार असल्यास प्रकल्पाचे समर्थक म्हणून त्यांनी भाजपमध्ये यावे. त्यांना पुन्हा निवडून आणण्याची जबाबदारी आपण घेऊ. तेवढाच भाजपचा आमदार वाढेल असे मिस्किलपणे नीतेश राणे यांनी यावेळी सांगितले.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tractor Morcha on 7 January in support of Agriculture Bill