
सत्तर वर्षात शेतकऱ्यांसाठी कोणीही काही केलं नाही ते सहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करुन दाखवलं
कणकवली (सिंधुदुर्ग) : उद्धव ठाकरेंना शेतीतलं काय कळतं ? ठाकरे आणि कोकणचं आधीपासूनच वाकडं आहे. मुख्यमंत्री मातोश्रीत बसून सरकार चालवत आहेत. शेतकरी देशाचा प्रमुख घटक आहे. राहुल गांधी यांना शेतीतलं काय कळतं? अशी टीका दोन्ही नेत्यांवर करीत सत्तर वर्षात शेतकऱ्यांसाठी कोणीही काही केलं नाही ते सहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करुन दाखवलं असे भाजपा नेते खासदार नारयण राणे यांनी येथे आपल्या भाषणातून व्यक्त केले.
केंद्र सरकारच्या कृषी कायदा समर्थनात सिंधुदुर्ग येथे आज (गुरुवार) ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी राणे बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार नितेश राणे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रदेश सचिव प्रमोद जठार यांच्यासह भाजपचे समर्थक शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत.
पुढे बोलताना राणे म्हणाले, गेल्या 70 वर्षात शेतकर्यांच्या भल्यासाठी काँग्रेस पक्षाला जे करता आलं नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करून दाखवलंय. शेतकर्यांना आपला कुठेही विकण्याची मुभा त्यांनी कृषी विधेयकातून दिली आहे. पण या विधेयकाला विरोध करणार्या राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांना शेतीमधलं काय कळतंय. 70 वर्षे जुन्या कायद्यांमुळे शेतकर्यांची कोंडी होत होती. दलालांच्या माध्यमातून आपला माल विकावा लागत होता. हे 70 वर्षाचे जुने कायदे मोदींनी मोडीत काढले. त्यामुळे काँग्रेसची पोटदुखी वाढली आहे. ते कृषी विधेयकाला विरोध करत आहेत.
ते म्हणाले, कोकणात अवकाळी पावसामुळे एवढी नुकसानी झाली. पण राज्यातल्या ठाकरे सरकारनं शेतकर्यांना काय दिलं. खरं तर ठाकरेंना कोकणाचं वावडं आहे. त्यामुळे एक रूपयाचीही मदत मिळालेली नाही. सिंधुदुर्गच्या विकासासाठी 142 रूपयांची तरतूद झाली. पण फक्त 21 कोटी रूपये दिले. यातून कसली विकास कामं होणार? असाही सवालही त्यांनी केला.