
एलईडीला विरोध; आज रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग प्रशासनाचे कारवाईसाठी लक्ष वेधणार....
हर्णैत पारंपरिक मच्छीमार का झाले आक्रमक ..?
हर्णै (रत्नागिरी) : पुन्हा एकदा एलईडी विरोधात पारंपरिक मच्छीमार बांधवांनी रानच पेटवलं आहे. उद्या २६ जानेवारीनिमित्त रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमार जिल्हाधिकाऱ्यांना अनधिकृत एलईडी मासेमारी बंदीसंदर्भात त्वरित कडक कारवाई करण्याबाबतचे निवेदन देणार आहेत.
मंत्र्यांनी दिलेल्या बंदीसंदर्भात कडक कारवाईचे आदेश व उद्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाणारे निवेदन, याने काय कारवाई होणार, याकडे तीन जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमारांचे लक्ष लागले आहे.उपासमारीची वेळ आल्यामुळे पारंपरिक मच्छीमार व एलईडी मासेमारी करणारे मच्छीमार यांमध्ये संघर्ष पेटत चालला आहे.
चार दिवसांपूर्वीच पर्ससीननेट मासेमारी, एलईडी मासेमारी संघटना व पारंपरिक मच्छीमार संघटना यांची राज्य मत्स्यव्यवसाय मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत संयुक्त बैठक पार पडली. तसेच या वेळी एलईडी मासेमारीवर त्वरित बंदची कारवाई करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे यांना दापोली-गुहागर-मंडणगड तालुका मच्छीमार संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.
हेही वाचा- सावधान ! सावंतवाडीत भरदिवसा होतीय घरफोडी....
एलईडी मासेमारी करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश
.राज्यमंत्री भरणे यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान एलईडी मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवांच्या समोरच पारंपरिक मच्छीमार बांधवांची कैफियत ऐकून थेट एलईडी मासेमारी करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे पारंपरिक मच्छीमार बांधवांना थोडा दिलासा मिळाला आहे. तेवढ्यावरच न थांबता काल ता. २४ रोजी सायंकाळी हर्णै बंदरामध्ये बहुसंख्य मच्छीमार बांधवांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उद्या २६ जानेवारीनिमित्त प्रत्येक जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमार जिल्हाधिकाऱ्यांना एलईडी मासेमारी बंदीसंदर्भात निवेदन देतील.
हेही वाचा- नीतेश राणे म्हणाले ; यामुळे मोडला कोकणच्या विकासाचा कणा ....
मच्छीमार सोसायटीचे शिष्टमंडळ..
दरम्यान, उद्या सकाळी प्रत्येक जिल्ह्यातील त्या त्या परिसरातील प्रत्येक मच्छीमार सोसायटीचे एक शिष्टमंडळ हे निवेदन देण्यासाठी हजर राहणार आहे. हे निवेदन रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.