जगबुडी नदीवरील जुन्या पुलावरून वाहतूक अखेर बंद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

खेड - मुंबई - गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवर बांधलेला नवा पूल अवजड वाहनांसाठी अखेर खुला करण्यात आल्याने गेली दीडशे वर्ष वाहनांचा भार सोसणाऱ्या जुन्या जगबुडी पुलाने मोकळा श्वास घेतला आहे. आयुर्मानानुसार गेली काही वर्ष जुना पूल अतिशय धोकादायक झाला होता. 

खेड - मुंबई - गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवर बांधलेला नवा पूल अवजड वाहनांसाठी अखेर खुला करण्यात आल्याने गेली दीडशे वर्ष वाहनांचा भार सोसणाऱ्या जुन्या जगबुडी पुलाने मोकळा श्वास घेतला आहे. आयुर्मानानुसार गेली काही वर्ष जुना पूल अतिशय धोकादायक झाला होता. 

पावसाळ्यात जगबुडीला पूर आला की पुलाचे खांब थरथरत होते. मात्र त्या परिस्थितीत हा पूल प्रतिदिनी हजारो वाहनांचा भार सोसण्यासाठी खंबीरपणे उभा होता. जगबुडी नदीवरील जुना पूल हा ब्रिटिश राजवटीत बांधला होता. काळ्या दगडाचे आठ पिलर गेली अनेक वर्षे पुलावरून होणारी वाहतूक सोसत होते. पावसाळ्यात जगबुडीला येणारा पूर या दगडी खांबांना धक्के देत खिळखिळे करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र दगडी खांब पुराच्या पाण्यालाही दाद देत नव्हते. 

2005 साली झालेल्या अतिवृष्टी दरम्यान जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. अनेक वर्षाच्या कालखंडानंतर प्रथमच जगबुडीचे पाणी पुलावरून वाहू लागले होते. पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून आलेल्या मोठमोठ्या लाकडाच्या ओंडक्‍यांनी पुलाला जोरदार धडकही द्यायला सुरवात केली होती.

पुलाचे जुने झालेले खांब थरथरू लागल्याने पुलावरील वाहतूक प्रशासनाला बंद करावी लागली होती. त्यावेळी जगबुडीचा रुद्रावतार पाहून धोकादायक झालेला पूल वाहून जाणार असेच सर्वाना वाटत होते. मात्र सुदैवाने तसे काही झाले नाही. जगबुडीचे पाणी पुलावरून वाहिले तरी पुलाचा पुष्ठभाग थोडासा उखडण्यापलीकडे फारसे काही झाले नव्हते. त्यानंतर तब्बल चौदा वर्षे हा पूल प्रतिदिनी हजारो वाहनाचा भार सोसतच राहिला. 

वर्षानुवर्षे जगबुडी पूल धोकादायक होऊ लागल्याने 2015 साली या नदीवर नवा पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पुलासाठी आवश्‍यक तो निधी प्राप्त झाल्यावर नवीन पुलाची उभारणीही करण्यात आली. दोन वर्षात नवा पूल वाहतुकीस खुला होणे आवश्‍यक होते. मात्र ठेकेदाराने केलेल्या विलंबामुळे नव्या पुलाचे काम पूर्ण होण्यास चार वर्षे लागली.

चार वर्षानंतर पुलाचे काम पूर्ण झाले. मात्र दोन्ही बाजूचे ऍप्रोच रोडचे काम न करताच ठेकेदाराने काम सोडून दिल्याने नवा पूल उभारूनही सुरू करण्यात अडचणी येत होत्या. अखेर ऍप्रोच रोडचे काम महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कल्याण टोलवेज या ठेकेदार कंपनीला देण्यात आले. पावसाळ्यापूर्वी नवा पूल चालू करण्यासाठी ठेकेदार कंपनीने युद्धपातळीवर काम सुरु केले. मात्र या गडबडीत कामाचा दर्जा न राखला गेल्याने पहिल्या पावसातच दोन्ही बाजूचे ऍप्रोच रोड खचले आणि पावसाळ्यापूर्वी नवा पूल वाहतुकीस खुला करण्याच्या प्रयत्नावर पाणी फेरले. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic finally closed from the old Jagbudi River bridge