अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत वाहतूक कोंडीने कोंडमारा

अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात नाताळच्या सुट्ट्या व नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटक दाखल होत आहेत.
Traffic in Pali
Traffic in PaliSakal
Summary

अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात नाताळच्या सुट्ट्या व नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटक दाखल होत आहेत.

पाली - अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात (Pali City) नाताळच्या सुट्ट्या व नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटक (Tourist) दाखल होत आहेत. भाविक व पर्यटकांची वाहने, तसेच इतर अवजड वाहने व डंपर यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी (Traffic Issue) जटिल होत आहे. दिवसा आणि रात्री देखील कोंडी होत असते. परिणामी पर्यटक, भाविक व नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. (Traffic in Pali)

पाली हे तालुक्याचे ठिकाण आहे. परिणामी अनेक लोक कामानिमित्त व विद्यार्थी शाळा व कॉलेजमध्ये येत असतात. परिणामी कोंडीमुळे वाहनचालक, भाविक, पादचारी व विदयार्थ्यांची येथून वाट काढतांना मोठी गैरसोय होते. शिवाय दुर्घटना घडण्याची शक्यता देखील आहे.

इथे होते कोंडी

बल्लाळेश्वर मंदिर ते ग.बा. वडेर हायस्कूल, मारुती मंदिर चौक ते जुने एस.टी.स्टँड, गांधी चौक ते बाजारपेठ, कुंभारआळी, बँक ऑफ इंडिया, हटाळेश्वर चौक ते मिनिडोअर स्टँड, एसबीआय बँक ते गांधी चौक अशा अनेक ठिकाणी नियमित वाहतूक कोंडी होते.

म्हणून होते कोंडी

पालीत खाजगी अवजड व लक्झरी वाहनांची नियमीत ये-जा सुरु असते. खडी वाहून नेणारे डंपर मोठ्या प्रमाणात येजा करतात. यामुळे वाहनांना येण्या जाण्याचा मार्ग मिळत नाही. तसेच नियमांचे उल्लंघन करणारे वाहन चालक देखील वाहतूक कोंडीत भर घालतात. पालीतील रस्ते हे खूप अरूंद आहे. अशा अरुंद रस्त्याच्या दुतर्फा अनेकजण आपली दुचाकी व मोठी वाहने पार्क करतात व खरेदी किंवा इतर कामासाठी जातात. अनेक दुकाने, टपर्या व इमारती रस्त्याच्या अगदी कडेला आहेत. काही ठिकाणी तर अनधिकृत बांधकामे देखील बांधली गेली आहेत. याबरोबरच रस्त्याच्या बाजुला सुरु असलेली बांधकामे आणि या बांधकामाचे साहित्य रस्त्यावर पडलेले असते यामूळे येथून मार्ग काढणे वाहनचालकांना शक्य होत नाही. यामुळे देखिल पालीत सतत वाहतूक कोंडी होत असते. तसेच सुट्टयांच्या काळात तर मोठ्या प्रमाणात पर्यटक व भाविक पालीत दाखल होत आहेत. या वाहनांमुळे पालीतील वाहतुकीवर प्रचंड ताण येवुन वारंवार अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी होत आहे.

Traffic in Pali
रत्नागिरीमध्ये आघाडीबाबत शिवसेनेकडून तळ्यात-मळ्यात

इतरही वाहनांची रेलचेल

मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था आणि वाहतुक कोंडी. त्यामुळे मुंबईवरून कोकणाकडे जाणारे प्रवासी पालीतून विळेमार्गे माणगाव वरुन किंवा वाकण वरून पुढे जातात. तर कोकणाकडून येणारी वाहने माणगाव वरुन विळे मार्गे पालीतून खोपोलीमार्गे पुणे-मुंबईकडे जातात. परिणामी पालीत वाहनांची रेलचेल वाढून अधिक वाहतूक कोंडी होते. बाह्यवळण मार्ग निर्माण झाल्यास हि वाहने पालीच्या बाहेरूनच निघून जातील त्यामुळे हि वाहतूक सुरळीत होऊ शकते.

बाह्यवळण मार्ग झाल्यास कोंडी फुटेल

राज्यशासनाने सन २०१० या वर्षी पाली बाह्यवळण मार्गाला मान्यता दिली आहे. तसेच रस्त्यास १८ कोटी तर भूसंपादनासाठी १० कोटींची मंजुरी मिळाली होती. सदरचा मार्ग हा वाकण पाली मार्गावरील बलाप येथून पाली पाटनुस राज्यमार्ग ९४ ला जोडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने खाजगी एजन्सीद्वारे मार्गाचा प्लॅन फायनल केला आहे. त्यानुसार रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी त्यास मान्यता देवून प्रांत अधिकाऱ्यांना जमिन अधिग्रहणाच्या सुचना दिल्या होत्या. या मार्गालगत येणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनी नष्ट होणार असल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. त्यांचा या मार्गाला विरोध आहे. परिणामी विविध कारणांमुळे मार्गाचे काम रखडले आहे. बाह्यवळण मार्ग झाल्यास येथील कोंडी फुटू शकेल.

वारंवार होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे सर्वांचीच मोठी गैरसोय होते. डंपर व अवजड वाहनांमुळे अधिक कोंडी होते. शिवाय अपघाताचा धोका देखील आहे. याबाबत ठोस उपाययोजना करावी. तसेच वाहनचालकांनी देखील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

- सुशील शिंदे, तरुण, सामाजिक कार्यकर्ते, पाली

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध नाक्यांवर पोलीस तैनात असतात. वाहनचालकांनी नियमांचे पालन केल्यास वाहतूक सुरळीत होईल. डंपरची वाहतूक रात्रीच्या वेळी रहदारी नसतांना करण्याची व्यवस्था करण्यात येईल.

- अजित साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पाली

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी व अवजड वाहतूक नियंत्रित करण्यासाठी योग्य उपयोजना केली जाईल.

- दिलीप रायण्णावार, तहसीलदार, पाली-सुधागड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com