शिक्षकांच्या बदल्या निश्चित, सिंधुदुर्गातील संख्या अशी...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 July 2020

विनंती बदलीसाठी समोरच्या शिक्षकांची मनधरणीचा प्रयत्न सुरू आहे. अनेकांना तालुका बदली कराव्या लागणार असल्याचे मोठी पंचाईत झाली आहे. 

ओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोनामुळे जिल्हा अंतर्गत शिक्षक बदल्या ऑफलाईन करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. जिल्ह्यात निकषानुसार एकूण 508 शिक्षक बदलीस पात्र ठरणार आहेत. शासनाने या बदल्या 31 जुलैपर्यंत पूर्ण करण्याची मुदत दिली आहे; मात्र कोरोनामुळे एकाच वेळी 500 शिक्षकांना बदलीसाठी कसे बोलवायचे? असा प्रश्‍न प्रशासनासमोर आहे. 

शासनाने ऑनलाईन शिक्षक बदलीमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने यावर्षी बदल करीत ऑफलाईन बदल्या करण्याचा आदेश दिला आहे. यामुळे यावर्षी या बदल्या जिल्हास्तरावर शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार होणार आहेत. यात आजारी, अपंग, अपघात यांच्यासाठी शिक्षकांना संवर्ग 1 मध्ये संधी मिळणार आहे. पती-पत्नी एकत्रीकरण, अवघड क्षेत्रात तीन वर्षे पूर्ण झालेले शिक्षक, सर्व साधारण क्षेत्रात 10 वर्षे पूर्ण करणारे शिक्षक आणि विनंती बदली हे सर्व निकष लावत या बदल्या कराव्या लागणार आहेत. सर्व तालुक्‍यांची रिक्त पदे समान करण्यासाठी समानीकरण साधत या बदल्या कराव्या लागणार आहेत. 

वाचा - गणेशोत्सव तयारी : बाहेरून येणार्‍यांना क्वारंटाईन करण्यावर भर, लवकरच व्हीजन निश्‍चित  : डॉ. इंदुराणी जाखड 

जिल्ह्यात एकूण पदांच्या 12.37 टक्के पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात सध्या उपशिक्षक 2 हजार 595 पदे कार्यरत आहेत. तर 697 पदवीधर शिक्षक कार्यरत आहेत. यातील शासनाच्या निकषानुसार 15 टक्के शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. त्यानुसार उपशिक्षकांच्या 404 तर पदवीधर शिक्षकांतील 104 जणांच्या बदल्या होणार आहेत. एकूण 508 शिक्षकांसाठी ही बदली प्रक्रिया राबवावी लागणार आहे; मात्र यातील बदली पात्र शिक्षकांची यादी तयार करणे, ती प्रसिद्ध करणे आणि प्रत्यक्ष बदली प्रक्रिया राबविणे याला मोठा कालावधी अपेक्षित आहे; परंतु शासनाने 31 जुलै ही अंतिम मुदत दिल्याने या बदली प्रक्रियेसाठी कालावधी कमी पडत आहे.

परिणामी प्राथमिक शिक्षण विभागात लगिन घाई सुरू झाली आहे. जिल्हा परिषद कर्मचारी संवर्गातील शिक्षक मोठ्या संख्येने आहे. कोरोनामुळे जास्त संख्येने लोक जमा होण्यास मनाई आहे. त्यामुळे पाचशेच्यावर शिक्षकांना एकाचवेळी कसे बोलवावे? हा प्रश्‍न आहे. 

चांगल्या शाळेसाठी प्रयत्न 
निकषानुसार बदलीसाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांनी चांगली शाळा मिळावी, यासाठी आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. यासाठी कोणत्या शिक्षकांची बदली होणार? त्यातील सोइस्कर शाळा कोणती? याबाबतची माहिती घेण्यास सुरुवात केली असून त्यातील चांगली शाळा मिळण्यासाठी अंतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत. विनंती बदलीसाठी समोरच्या शिक्षकांची मनधरणीचा प्रयत्न सुरू आहे. अनेकांना तालुका बदली कराव्या लागणार असल्याचे मोठी पंचाईत झाली आहे. 

शासनाने 15 जुलैला जिल्हा अंतर्गत शिक्षक बदल्या ऑफलाईन करा, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार माहिती संकलित करीत आहोत; परंतु एवढ्या मोठ्या संख्यने बदली प्रक्रियेसाठी एकत्र आणणे धोकाच आहे. त्या अनुषंगाने विचार करीत आहोत. नियोजन सुरू आहे. शासनाने आदेश काढले तरी या अडचणीमुळे बदली प्रक्रिया राबवायची की नाही? याबाबत स्पष्ट केलेले नाही. 
- एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी  

संपादन ः राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transfer of teachers in Sindhudurg district till 31st July