पालेभाज्या चिपळूणात आणण्यात अडचणी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

नेहमीच्या दरापेक्षाही स्वस्तात भाजीची विक्री केली. आता भाजीचा तुटवडा जाणवत आहे. मोठ्या शहरातील मंडई बंद केल्या आहेत. लिलावाच्या ठिकाणी आम्ही वाहने घेऊन जातो. पण, शेतकरीच येत नाहीत.

चिपळूण ( रत्नागिरी) - शेतकऱ्यांकडे पालेभाज्या भरपूर प्रमाणात आहेत. मात्र, हा माल चिपळूणपर्यंत येत नाही. जे शेतकरी रोज माल घेऊन येत होते, त्यांना कोरोनामुळे गावात निर्बंध घातले आहेत. शेतकरी विक्रीसाठी मालच आणत नाहीत. त्यामुळे काही भाज्यांचे दर वाढले आहेत, अशी माहिती येथील भाजी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुधीर शिंदे यांनी दिली. 

ते म्हणाले, की गावाकडील शेतकरी आपल्या शेतातील माल मोठ्या शहरात आणतात. तेथे रोज लिलाव केला जातो. आम्ही लिलावाचा माल घेण्यासाठी वाशीसह मोठ्या शहरात जातो. मात्र, कोरोनामुळे शेतकरी लिलावासाठी भाजी आणत नाहीत. त्यामुळे आमच्यासमोर मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात आम्हाला मोठ्या प्रमाणात भाजी मिळाली. लोकांची मागणी लक्षात घेऊन आम्ही आवकही मोठ्या प्रमाणात करून ठेवली होती.

नेहमीच्या दरापेक्षाही स्वस्तात भाजीची विक्री केली. आता भाजीचा तुटवडा जाणवत आहे. मोठ्या शहरातील मंडई बंद केल्या आहेत. लिलावाच्या ठिकाणी आम्ही वाहने घेऊन जातो. पण, शेतकरीच येत नाहीत. शेतमाल उचलण्यासाठी हमालही मिळत नाही. त्यामुळे सध्या जे दर सुरू आहेत, त्याच दराने भाजी विक्री होईल. किलोमागे दहा ते पंधरा रुपये वाढ झाली तर त्याची निश्‍चित तक्रार करा, असे श्री. शिंदे यांनी सांगितले. 

मला मेथीच्या एक हजार पेंढ्या आणायच्या होत्या. त्यासाठी वाशी मार्केटमध्ये शेतकऱ्यांची वाट पाहत राहिलो. काही शेतकऱ्यांनी मेथी आणली. पण, उचलायला हमाल नव्हते. माझ्या वाहनचालकाने या मेथीच्या जुड्या गाडीत भरल्या. रायगडमध्ये आल्यानंतर मला पोलिसांनी अडविले. मी रायगड खरेदी-विक्री संघाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याला फोन करून माझी गाडी सोडवून घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले. 

सोशल डिस्टन्सकडे नागरिकांचे दुर्लक्ष 

कोरोनामुळे गर्दी करून भाजीपाला घेऊ नका, असे प्रशासनाचे आदेश आहेत. त्यामुळे ठराविक अंतर ठेवून भाजी खरेदी करा. प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करा. मास्क लावून भाजी खरेदी केली पाहिजे, असे आम्ही नागरिकांना सांगत असतो. मात्र, नागरिकांकडून अजूनही तितका प्रतिसाद मिळत नाही, असे श्री. शिंदे यांनी सांगितले. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transport Of Vegetable Difficult In Chiplun Due To Lock-down