गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासात सवलतीसाठी कोण जाणार मुख्यमंत्र्यांकडे... वाचा

मुझफ्फर खान
Saturday, 25 July 2020

गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यातील चाकरमानी मोठ्या संख्येने गावी येतील. त्यावर कोणाचा आक्षेप असता कामा नये.

चिपळूण : लॉकडाउनमुळे गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासात सवलत मिळाली पाहिजे. तो त्यांचा अधिकारच आहे. या मागणीसाठी आपण व कोकणातील अन्य लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्याकडे आग्रह धरणार आहे. येत्या आठवडाभरात त्याबाबतची नियमावली जाहीर केली जाईल, असे राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर कामकाजाचा आढावा घेण्यासाठी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या तटकरे यांनी येथील प्रमुख पदाधिकारी व विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. बैठकीत निसर्ग वादळ व कोरोनाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेतला. शिवाय गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक असलेल्या तयारी विषयी काही सूचना केल्या. 

यानंतर आदिती तटकरे म्हणाल्या, "गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यातील चाकरमानी मोठ्या संख्येने गावी येतील. त्यावर कोणाचा आक्षेप असता कामा नये. गावी ज्या पद्धतीने प्रत्येकजण कोरोनाचा सामना करीत आहे. त्याहून अधिक चाकरमान्याला मुबईत राहून संघर्ष करावा लागतो आहे. त्यामुळे गावी येणाऱ्या चाकरमान्यांना सन्मानाने वागणूक मिळायला हवी. एवढेच नव्हे तर त्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता आला पाहिजे. यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत.`` 

रुग्णवाहिका व अन्य सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने काही उद्योगांची मदत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करू. रायगडमध्ये रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून काही रुग्णवाहिका व अन्य यंत्रणा उपलब्ध केल्या आहेत. त्या धर्तीवर येथेही प्रयत्न केले जाणार असून जिल्हाधिकाऱ्यांसमवेत होणाऱ्या बैठकीत त्यावर निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी आमदार शेखर निकम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी आमदार रमेश कदम, महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण आदी उपस्थित होते. 

केंद्राची मदत देण्यास टाळाटाळ 
निसर्ग चक्रीवादळातील बाधित कुटुंबीयांना दिलेली मदत ही प्रत्येक वृक्षामागे असायला हवी होती. मात्र, सरसकट भरपाई दिल्याने झालेले नुकसान भरून येणार नसले तरी केंद्र शासनाकडून मदत मिळायला हवी. केंद्र सरकार मदत देण्यास टाळाटाळ करीत आहे, असा आरोपही आदिती तटकरे यांनी केला.

संपादन - विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Travel concessions is right of CHAKARMANI... who said this