भन्नाट स्टोरी: गेल्या 15 वर्षांपासून एक कावळा येतो आणि दररोज दाराची कडी वाजवतो

सचिन माळी
Saturday, 23 January 2021

चिखलकर यांची कहाणी काही औरच आहे. कावळा त्यांच्या अंगा खांद्यावर येऊन बसतो

मंडणगड (रत्नागिरी) :  घरी  पाळीव प्राणी सांभाळण्याचा छंद अनेकांना असतो. मग कुत्रा असो, अथवा गाय, बैल, म्हैस, असो अनेकांचे छंद वेगवेगळे. एखाद्या प्राण्याची आपल्याला सवय इतकी जडते की, त्याच्या शिवाय आपण राहू शकत नाही. पण एखाद्या पक्षाला आपली सवय झाली तर किंवा त्याच्या भावविश्वात आपला समावेश झाला तर तो पक्षीही आपल्या  शिवाय राहू शकत नाही. याचा प्रत्यय आलाय  कोकणातील एका कुटुंबाला. केवळ एक दिवस नाही तर तब्बल 15 वर्षे एक पक्षी एका कुटुंबाचा मेंबर झाला आहे. दाराची कडी वाजली की, तो त्याच आगमन झालचं म्हणून समजा देवाचे फुल चुकेल पण त्याच घरी येणं चुकणार नाही. कावळ्याच्या सवयीची चर्चा परीसरात जोरदार सुरु आहे. 

मंडणगड तालुक्यातील तुळशी गावात पंधरा वर्षांपासून एक कावळा एका कुटुंबावर प्रेमळ हक्क गाजवताना घरी येऊन त्यांच्याच हाताने खाणं घेत आहे. लळा लागलेल्या या कावळ्याला त्यांनीही आपल्या भावविश्‍वात सामावून घेतलं आहे.काशिनाथ चिखलकर यांचे या कावळ्याशी अनोखे नाते जडले आहे.
चिखलकर यांची कहाणी काही औरच आहे. कावळा त्यांच्या अंगा खांद्यावर येऊन बसतो. त्यांनी दिलेले फरसाण, चपाती, डाळ-भात, पीठ खातो, दूध पितो. कामावर जाताना त्यांच्या डोक्यावरून उडत अर्ध्या रस्त्यात सोडायला जातो. 

हेही वाचा- भाजपमध्ये अनेकजण वैतागलेले; सुप्रिया सुळेंच मोठ वक्तव्य -

संध्याकाळी सायकलवरून घरी येताना दिसताच पुन्हा येतो. आणलेला खाऊ काढेपर्यंत लहान मुलांप्रमाणेच कावळ्यालाही धीर नसतो. काही वेळेस तर त्यांच्या हातातून खाऊ ओरबाडून घेतो. चिखलकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले की, 15 वर्षांपूर्वी तुळशी पिचुर्लेवाडीत बाली अक्का यांच्या घरात राहत असताना एके दिवशी सकाळी दरवाजाची कडी वाजली.

बाहेर येऊन पाहिलं असता कोणीही आढळून आले नाही. शेजार्‍यांना विचारलं असता त्यांनाही कोणी दिसलं नाही. दुसर्‍या दिवशी पुन्हा सकाळी कडी वाजली. शेजार्‍यांनी कावळ्याने कडी वाजवल्याचे सांगितले. त्यानंतर कावळा रोजच येऊ लागला. त्याला खायला, प्यायला देत गेलो. दोन वर्षांनंतर ते गावातीलच खैरवाडी येथे वास्तव्याला आले. कावळाही त्या ठिकाणी येऊ लागला. मध्यंतरी दोन वर्षे काशिनाथ नोकरीनिमित्त मुंबईत गेले. तेव्हा कावळा यायचाच बंद झाला. लॉकडाउनमध्ये ते गावी आल्यानंतर हा पुन्हा घरी येऊ लागला. 

 विविध लकबीतून प्रेम व्यक्त

चिखलकर घराच्या दारात झोपले असताना चोचीने पायाला ओढत तो जागे करतो. सकाळी नळाला पाणी आणि त्याची यायची एकच वेळ असते. त्यांनी सांगितल्यानंतर पाणी भरेपर्यंत तो समोरच्या निलगिरी झाडावर बसून राहतो. बोलावण्यासाठी हात दाखवला किंवा आवाज दिला तर लगेच खाली येऊन बाजूला बसतो. ओरडणेही कर्कश नसते.

कुटुंबाला प्राणी, पक्ष्यांविषयी प्रेम
चिखलकर यांच्याकडे कबुतर, कुत्रे, मांजर आहे.त्यांनी पाळलेला कुत्रा रोज येणार्‍या व्यक्तीला बरोबर ओळखतो. त्याला सांगितलं की तो जाऊन त्या व्यक्तीच्या कपड्यांना धरून खेचत आणत असे, असे  काशिनाथ यांच्या पत्नी प्रियांका सांगतात. काशिनाथ प्राणी, पक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढतात. एकदा तर त्यांनी सापाची पिल्लं घरी आणली त्या वेळी आईचे धपाटे खाल्ले. 

मुक्या प्राण्यांवर मनापासून प्रेम केलं, त्यांना खायला दिलं तर ते कायम ओळख ठेवतात. त्यांचे आशीर्वाद कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला मिळत असतात.
काशिनाथ चिखलकर

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tulsi village Crow story mandangad ratnagiri kokan letest news marathi news