किनाऱ्यावर मिळाले पहिले घरटे: समुद्रकिनारी निसर्गचक्र सुरळीत होण्याचा मिळाला इशारा

मयूरेश पाटणकर 
Sunday, 17 January 2021

गुहागरमधील १२३ अंडी केली संरक्षित 
कासव संवर्धन; किनाऱ्यावर मिळाले पहिले घरटे 

गुहागर (रत्नागिरी) : नव्या वर्षात ऑलिव्ह रिडले कासवाच्या मादीने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर अंडी घातल्याचे आढळले. पहिल्या घरट्यातील १२३ अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. निसर्ग वादळ, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्‍चिमेकडील समुद्रात निर्माण झालेली वादळजन्य परिस्थिती आणि अवकाळी पावसामुळे ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे अंडी घालण्यासाठी येण्याचा काळ तीन महिन्यांनी लांबला.

काही दिवसांपूर्वीपर्यंत कासवांची अंडी समुद्रकिनारी दिसून येत नव्हती. शनिवारी मात्र कासवांची अंडी दोन ठिकाणी दिसून आली आहेत. ती पुरेशी सुरक्षित आहेत. या घटनेमुळे पर्यावरणप्रेमींनी आनंद व्यक्त केला. वादळासह नैसर्गिक आपत्तीनंतर समुद्रकिनारी भागातील निसर्गचक्र सुरळीत सुरू होत असल्याची ही सुचिन्हे आहेत यामुळे समाधान व्यक्त होत आहे. समुद्रकिनारी दिसणारी कासवांची पावलं ही जणू लक्ष्मीची पावलं असल्याची भावना आज पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली.

हेही वाचा- कामाच्या वेळी मोबाईल स्वीच ऑफ असल्यास होणार थेट कारवाई आढळून -

गुहागरला स्मशानभूमी परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर शुक्रवारी सकाळी कासवमित्र आल्हाद तोडणकर यांना कासवाच्या अंड्यांचे एक घरटे सापडले. या घरट्यात १२३ अंडी होती. गेले तीन महिने आल्हाद तोडणकर दररोज पहाटे साडेसात कि. मी. लांबीचा समुद्रकिनारा तुडवत आहेत; मात्र आजपर्यंत त्यांना एकही घरटे सापडले नव्हते. त्यामुळे निराश झालेल्या श्री. तोडणकरांना नव्या वर्षात मात्र आनंदाचा क्षण गवसला. 
समुद्रकिनाऱ्यावरील खुणांवरून मादी अंडी घालण्यासाठी येऊन गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. मादी येऊन गेल्याच्या खुणा ठसठशीत असल्याने घरटे शोधण्यासाठी त्यांना मेहनत घ्यावी लागली नाही. घरट्यातून काढलेली अंडी वनखात्यांच्या कासव संवर्धन केंद्रात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. मादी अंडी घालून गेल्यामुळे आता हे प्रमाण वाढेल, असा अंदाज तोडणकर यांनी वर्तविला आहे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Turtle 123 eggs protected in Guhagar ratnagiri