काही सुखद ! `त्या` बारा विद्यार्थ्यांचे शिक्षण अनलाॅक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 September 2020

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर पाटील, गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंके आदींच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीतील विषयतज्ञ तन्वीर खान, समीर तांबे, महेश हळदणकर, सुमती पेंडखळकर आदींसह त्या-त्या गावांमधील शिक्षकांनी ही मोहीम राबविली असून त्याबद्दल शिक्षण विभागाचे कौतुक केले जात आहे. 

राजापूर ( रत्नागिरी ) - लॉकडाउनच्या काळामध्ये अनेक चाकरमानी कोकणात दाखल झाले होते. गावामध्ये अडकून पडलेल्या मुलांच्या शिक्षणासह अभ्यासाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. अशा बारा मुलांना येथील शिक्षण विभागाने शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. त्यांना पाठ्यपुस्तके देत अभ्यासही कार्यान्वित ठेवला आहे. सक्तीच्या शिक्षण कायद्याअंतर्गंत सर्वांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचा निर्धार शासनाने केला आहे. त्यानुसार लॉकडाउनच्या काळामध्येही ही मोहीम येथील शिक्षण विभागाने राबवली. 

मुंबईतील अनेक चाकरमान्यांची कुटुंबे कोकणात दाखल झाली आहेत. त्यापैकी काही कुटुंबे गेल्या पाच-सहा महिन्याच्या वास्तव्यानंतर गणेशोत्सवानंतर मुंबईला पुन्हा परतली असली तरी, मोठ्या संख्येने कुटुंबे अद्यापही गावाला वास्तव्याला आहेत. मार्च - एप्रिलमधील परीक्षांच्या काळात आलेली ही मुले याच ठिकाणी वास्तव्याला असल्याने त्यांच्या शिक्षणाचा प्रश्‍न निर्माण झाला होता.

अनेक गावांमध्ये मोबाईलची रेंज आणि इंटरनेट सुविधा नसल्याने त्या मुलांच्या अभ्यासाचा प्रश्‍न निर्माण होत होता. अशा मुलांचे सर्व्हेक्षण करून त्या मुलांना शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक प्रवाहात आणण्यात आले. 

आवश्‍यक असलेली पाठ्यपुस्तकेही शिक्षकांमार्फत उपलब्ध करून दिली आहेत. त्यापैकी काही विद्यार्थी ऑनलाइन तर काहीजण ऑफलाइन अभ्यासक्रमामध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात अभ्यासामध्ये खंड पडलेला नाही.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर पाटील, गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंके आदींच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीतील विषयतज्ञ तन्वीर खान, समीर तांबे, महेश हळदणकर, सुमती पेंडखळकर आदींसह त्या-त्या गावांमधील शिक्षकांनी ही मोहीम राबविली असून त्याबद्दल शिक्षण विभागाचे कौतुक केले जात आहे. 

गाव निहाय लाभ मिळालेले विद्यार्थी 
सोलगाव - 2 
देवाचे गोठणे - 3 
परूळे - 3 
कारवली - 4 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twelve Mumbai Servicemen Boys Stuck In Lock Down Gets Education In Konkan