सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिन्याभरात तब्बल अडीच हजार बाधित

विनोद दळवी
Thursday, 1 October 2020

जिल्ह्यात बुधवारी आणखी नव्याने 53 रुग्णांची भर पडली आहे.

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये कोरोनाने कहर केला असून, महिन्यातील 30 दिवसांत तब्बल दोन हजार 525 नवीन रुग्ण मिळाले आहेत. 73 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे; मात्र याचवेळी सुमारे दोन हजार व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. आज नव्याने पाच व्यक्तींचे निधन झाले आहे. आणखी 53 व्यक्तींचा अहवाल बाधित आला. 81 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

जिल्ह्यात 31 ऑगस्टला एकूण बाधित एक हजार 287 होते. आज ती संख्या तीन हजार 812 झाली आहे. मृत्यू संख्या केवळ 20 होती. आता त्यात 73 ने वाढ होऊन 93 झाली आहे. कोरोनमुक्तांची संख्या 668 होती. आता दोन हजार 648 झाली आहे. स्वॅब संख्या 13 हजार 557 होती. त्यात 12 हजार 481 ने वाढ होऊन एकूण संख्या 26 हजार 38 झाली. निगेटिव्ह अहवाल संख्या 12 हजार 166 वरून 22 हजार 47 झाली आहे. म्हणजे निगेटिव्ह अहवाल केवळ 9 हजार 881 ने वाढले आहे. याचा अर्थ वाढलेल्या नमुने संख्येच्या तुलनेत निगेटिव्ह अहवाल संख्या वाढलेली नाही. त्यामुळे सप्टेंबर सिंधुदुर्ग जिल्ह्याला धोकादायक ठरला आहे. 

जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. जिल्ह्यात बुधवारी आणखी नव्याने 53 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या तीन हजार 812 एवढी झाली आहे. यातील दोन हजार 567 रुग्णांना यापूर्वीच डिस्चार्ज देण्यात आला होता. 

आज नव्याने 81 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या दोन हजार 648 झाली आहे. एक हजार 71 रुग्ण सक्रिय असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली. 
नमुन्यांची एकूण संख्या 26 हजार 38 झाली. आज नव्याने 355 अहवाल आहे. नमुन्यांची एकूण संख्या 25 हजार 859 झाली आहे. 

सद्य:स्थितीत 179 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 67 व्यक्तींची वाढ झाल्याने येथे 16 हजार 694 व्यक्ती आहेत. यात गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्तींमध्ये 27 जणांची वाढ झाल्याने येथे तीन हजार 651 संख्या झाली आहे. नागरी क्षेत्रातील संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये नव्याने 40 व्यक्तींची वाढ झाल्याने येथील संख्या 13 हजार 43 झाली आहे. 

मृत्यू संख्येत वाढ 
जिल्ह्यात कोरोनाबाधित मृत्यू संख्या एकदम कमी होती; मात्र आता एकीकडे रुग्ण संख्या वाढत असतानाच कोरोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 24 ते 30 सप्टेंबर या कालावधीत तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाला. यात 24 सप्टेंबरला 1, 25 ला 2, 26 ला 6, 27 ला 3, 28 ला 5, 29 ला 3 आणि आज पाच बाधितांचा मृत्यू झाला. आठवड्यात प्रत्येक दिवशी मृत्यू झाला आहे. 

संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two and a half thousand corona infected in a month in Sindhudurg district