
दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - कपडे धुण्यासाठी चुलत बहिणीसोबत गेलेले दोघे चुलत भाऊ वझरे येथील चिरेखाणीच्या पाण्यात बुडून मृत्यू पावले. त्यातील एक पहिलीत तर एक दुसरीत शिकत होता. नागेश विठ्ठल जंगले (वय 6) आणि धोंडीराम भगवान जंगले (वय 7), अशी मृत मुलांची नावे आहेत. वझरे धनगरवाडीवर घडलेल्या त्या घटनेने अख्खा तालुका हादरला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, वस्तीपासून साधारण दीड किलोमीटर अंतरावर एक बंद चिरेखाण आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. दोन्ही बाजूला खोल पाण्याचे डोह आहेत. त्यातील एका डोहावर महिला कपडे धुतात. धोंडीराम आणि नागेश यांची चुलत बहीण सकाळी आठच्या दरम्यान त्या ठिकाणी कपडे धुण्यासाठी गेली. त्यावेळी ते दोघे तिच्यासोबत गेले. दोन्ही डोहाच्यामध्ये खाली उतरण्यासाठी वाट आहे.
उजव्या बाजूच्या डोहाकडे जाताना तिने त्यांना तिथेच थांबायला सांगितले; पण ती कपडे धुण्यात व्यस्त असताना ते दोघे पाण्यात बुडाले. ते कसे बुडाले हे समजणे कठीण आहे. ते घरी गेले असतील असे समजून त्यांची बहीण घरी गेली; पण चौकशी करता ते दोघेही घरी आले नसल्याचे कळले. त्यामुळे पुन्हा सगळ्यांनी चिरेखाणीवर जाऊन शोधाशोध केली असता त्यांचे मृतदेह पाण्यात आढळले. ते वाचतील या आशेने त्यांनी दोघांनाही घरी आणले.
शेजारीच ग्लोबल कोक (वेदांता) कंपनी आहे. त्यांची रुग्णवाहिकाही आली; पण त्यांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. संपूर्ण वस्तीवर शोकाकुल वातावरण होते. दोघांच्या आईचा विलाप काळीज पिळवटून टाकणारा होता. दोन शाळकरी चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली आणि तिथे मोठी गर्दी जमा झाली. सरपंच लक्ष्मण गवस, पोलिसपाटील, शिवसेना तालुकाप्रमुख बाबूराव धुरी, अनेक सामाजिक कार्यकर्ते, मुलांचे शिक्षक गुरुदास सावंत, उमा कासार, हेमांगी मळीक आदींनी पालकांना धीर दिला. दुपारपर्यंत पोलिसांची वाट पाहून दोन्ही मृतदेह कंपनीच्या रुग्णवाहिकेतून येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
पोलिसांबद्दल तीव्र संताप
दुर्घटनेची माहिती सरपंच आणि पोलिसपाटलांनी पोलिसांना लगेच फोन करून सांगितली; पण त्यांनी मृतदेह दोडामार्गला आणा मग बघू ,नाहीतर त्यांच्या पालकांना पोलिस ठाण्यावर पाठवा, असे उत्तर दिले. दुपारी दोन वाजेपर्यंत ते घटनास्थळावर पोचले नव्हते. त्याबद्दल उपस्थितांनी तीव्र संताप व्यक्त केला. जुगाराच्या अड्ड्यावर हेच पोलिस एका मिनिटात पोचले असते, दोन कोवळ्या जिवांचे यांना काही पडलेले नाही अशा शब्दात अनेकांनी पोलिसांच्या भूमिकेचा निषेध केला.
शिक्षिकांचा बांध फुटला
नागेश माटणे तळेवाडी शाळेत जायचा. अंगणवाडीत असल्यापासून त्याला शिक्षिका आपल्या गाडीवरून न्यायचा. तो दिवसभर त्यांच्या मागेच असायचा. अभ्यासतही तो हुशार होता. बोलका आणि लाघवी स्वभावामुळे तो त्यांचा लाडका होता. त्याच्या अकाली जाण्याची बातमी कळताच श्रीमती कासार आणि मळीक त्यांच्या घरी आल्या. आठवणी सांगताना त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. श्री. सावंत यांचीही अवस्था तशीच होती. धोंडीराम त्यांच्या शाळेत जायचा.
वाढदिवस राहून गेला
नागेश याचा वाढदिवस 28 ऑक्टोबरला होता. त्याचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय त्याच्या आई-वडिलांनी घेतला होता; पण नियतीला ते मान्य नसावे.
संपादन - राहुल पाटील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.