रत्नागिरीत दोन दिवसात पाच अवैध हातभट्ट्यांवर छापे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

जिल्ह्यात अवैध हातभट्ट्यांवर छापे टाकून पाच ठिकाणी कारवाई केली. 

रत्नागिरी : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी दिलेल्या आदेशानंतर जिल्ह्यात अवैध हातभट्ट्यांवर छापे टाकून पाच ठिकाणी कारवाई केली. 

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये देवरूख पोलिस ठाण्याचे निरीक्षक निशा जाधव व पथकाने मंगळवारी (६) कारवाई केली. बावनदी किनारी जंगलमय भागात, परशुराम वाडी, परिसरात संशयित रामकृष्ण धोंडू लाड (वय ४९ वर्षे, रा. परशुराम वाडी, देवरूख) याच्या हातभट्टीवर छापा टाकला. यामध्ये एकूण ५ हजार १०० रुपये किंमतीची हातभट्टीची दारू तयार करण्याचे साहित्य व हातभट्टीची दारू व रसायन असा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा -  नशीब देतं आणि कर्म नेतं : ‌ कोटीचा ‘घोळ’ जाळ्यातून निसटला!

रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल लाड व पथक यांनी मंगळवारी (६) हद्दीतील सोमेश्वर फाट्याजवळील पोमेंडी येथे संशयित केतन जयसिंग पिलणकर (वय ४४ वर्षे, रा. सोमेश्वर फाटा) याच्या ताब्यातून १ हजार ७६६ किंमतीची अवैध दारू जप्त केली. तसेच शहर पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या पथकाने काल (७) रोजी मिरजोळे, पाटीलवाडी येथे छापा टाकला. यामध्ये सुरेश रामचंद्र पारकर (वय ४५ वर्षे, रा. उद्यमनगर) रत्नागिरी याच्या ताब्यातून ४० लिटर हातभट्टीची दारू जप्त केली. 

पूर्णगड पोलिस निरीक्षक सुरेश गावित व पथक यांनी काल मेर्वी, महादेवाडी येथे संशयित आरोपी दीपक एकनाथ खरडे (वय ३४ वर्षे, रा. मेर्वी) याच्या ताब्यातील हातभट्टीची दारू जप्त केली. 
 चिपळूण पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ व पथक यांनी काल पागनाका येथे पॉवर हाउसमागे संशयित आरोपी सुचिता सुरेश सावंत (वय ५३ वर्षे, रा. पाग, पॉवर हाउसमागे ता. चिपळूण) यांच्या ताब्यातून हातभट्टीची दारू व इतर सामान जप्त केलेले आहे. दोन दिवसाच्या कारवाईत सुमारे साडेदहा हजाराची दारू आणि मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, पाेलिसांनी आता धडक कारवाईस  सुरवात केली. 

हेही वाचा - कोकणातील प्रवाशांवर अन्याय : तुतारी एक्‍स्प्रेस सावंतवाडीपर्यंतच 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in two days five illegal raids found by police in ratnagiri