रत्नागिरी : रक्ताच्या उलट्या आणि जुलाबाने दोघांचा मृत्यू ;14 जण तपासणीसाठी दाखल

सुधीर विश्वासराव
Wednesday, 11 November 2020

त्यांच्या आवश्यक चाचण्या करायच्या आहेत. त्याचा अहवाल आल्याशिवाय नेमके कारण समजणार नाही

पावस - रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे-थूलवाडी येथील दोघांचा उलट्या-जुलाब होऊन मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तातडीने वाडीतील 14 जणांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. 

मावळंगे-थूलवाडी येथील अनेक लोक गावखडी येथील एकाच शेतकर्‍याकडे भात कापणीसाठी काही दिवसांपूर्वी गेले होते. हा परिसर खार्‍या पाण्याचा असल्यामुळे त्याचा त्रास झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिथे भात कापणीसाठी गेलेले मावळंगे येथील राहुल मंगेश थूळ गेले अनेक दिवस आजारी होते. स्थानिक पातळीवर त्याच्यावर उपचार करण्यात आले. परंतु हातपाय दुखणे, रक्ताच्या उलट्या झाल्यामुळे 10 नोव्हेंबरला तो मृत झाला. त्यानंतर त्याच भागात भात कापणीसाठी गेलेली सौ. शालिनी थूळ काही दिवस आजारी होती. औषधोपचार सुरू असताना तिच्या नाकातोंडातून रक्त येऊन ती मृत झाली. त्यामुळे वाडीमध्ये घबराट पसरली. त्यामुळे पुढील धोका टाळण्यासाठी व तिचे साथीत रूपांतर होऊ नये यासाठी 14 पुरुष व महिलांना वैद्यकीय तपासणीसाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

यासंदर्भात रत्नागिरी तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी तातडीने मृत व्यक्तींच्या घरी जाऊन घटनेची माहिती घेतली आणि त्याचा अहवाल पुढे पाठविण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना या रोगामुळे मावळंगे गावामध्ये घबराट पसरली आहे.

चाचण्यांचा अहवाल आल्यानंतरच कारण स्पष्ट ; डॉ. फुले

याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, हे सर्वजण सिव्हीलमध्ये दाखल झाले आहेत. मात्र त्यांच्या आवश्यक चाचण्या करायच्या आहेत. त्याचा अहवाल आल्याशिवाय नेमके कारण समजणार नाही. तसेच त्यांच्या नातेवाईकांच्याही चाचण्या करण्यात येणार आहे.

हे पण वाचा - बागायतदारांची फसवणूक करणाऱ्या महिलेचा जामिन अर्ज पुन्हा फेटाळला

 

14 जणांची होणार संपूर्ण तपासणी ः डॉ. इंगळे

यासंदर्भात रत्नागिरी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मावळंगे येथे झालेल्या दोघांच्या मृत्यूचा शवविच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे त्याबाबत अद्याप काही निष्कर्ष काढता येत नाही. परंतु या 14 लोकांना कोणता संसर्ग झाला आहे, याच्या माहितीसाठी त्यांची संपूर्ण तपासणी शासकीय रुग्णालयात करण्यात येणार आहे. त्या अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल. मात्र त्यांच्याजवळ संपर्कात आलेल्या इतर लोकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. जेणेकरून संभाव्य धोका टाळता येईल. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two dead in ratnagiri