बिबट्याच्या हल्ल्यात `येथे` दोन जनावरे ठार 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 August 2020

पाड्याला वाचविण्यासाठी गाय सरसावली; मात्र पिसाळलेल्या बिबट्याने त्या गायीवरही हल्ला चढवला. यामध्ये वासरासह गायही मृत पावली. जनावरे ओरडत असल्याचे लक्षात आल्यानंतर रमेश बोडेकर हे कुरणाकडे गेले

रत्नागिरी - रानात चरण्यासाठी गेलेल्या जनावरांच्या कळपावर हल्ला करुन दोन जनावरांना बिबट्याने ठार मारल्याचा प्रकार देवळेजवळील चाफवली-भोयरेवाडी येथे रविवारी (ता. 2) घडला. या प्रकारामुळे बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. 

भोयरेवाडी - धनगरवाडीत 15 ग्रामस्थांची घरे आहेत. शेती आणि दुग्ध व्यवसायावर या लोकांची गुजराण चालते. त्यामुळे पाळीव जनावरे अधिक आहेत. जवळच्या कातळावरील रानात चरण्यासाठी जनावरे सोडण्यात येतात. येथील रमेश पांडुरंग बोडेकर हे कुरणात जनावर चरविण्यासाठी रविवारी (ता. 2) सकाळी आठच्या सुमारास गेले होते. जनावरे अचानक सैरवैरा धावू लागली. त्यावेळी बिबट्या एका जनावराचा पाठलाग करताना आढळला. बिबट्याच्या तडाख्यात एक पाडा सापडला.

पाड्याला वाचविण्यासाठी गाय सरसावली; मात्र पिसाळलेल्या बिबट्याने त्या गायीवरही हल्ला चढवला. यामध्ये वासरासह गायही मृत पावली. जनावरे ओरडत असल्याचे लक्षात आल्यानंतर रमेश बोडेकर हे कुरणाकडे गेले. तेथील दृश्‍य पाहिल्यानंतर बोडेकर यांची भितीने गाळण उडाली. आरडाओरड करत वाडीकडे धावले. त्यांचा आवाज ऐकुन ग्रामस्थही घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांचा आवाज ऐकल्यानंतर बिबट्याने जंगलाच्या दिशेन धाव घेतली.

हा प्रकार पोलिस पाटील यांच्यापुढे मांडण्यात आला. पंचनामा करण्यात आला आहे. या वेळी ग्रामपंचायत सदस्य सुरेश भोजे, सुरेश चाळके आदी उपस्थित होते. वाडीच्या परिसरात बिबट्याचे वास्तव्य आधीपासूनच आहे; परंतु आतापर्यंत त्याने जनावरांवर हल्ला केलेला नाही. या ठिकाणाहून मुलांच्या शाळेची पायवाट आहे. सध्या परिस्थिती गंभीर असून ग्रामस्थांच्या नियमित कामकाजावर परिणाम झाला आहे. 

 

संपादन - राजेंद्र घोरपडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Domestic Animals Dead In Leopard Attack In Chaphavali