देवरुखमध्ये विसर्जन दरम्यान बुडणाऱ्या दोघांना वाचवले 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 August 2020

तीन वर्षापूर्वी देवरुख मधील निनाद जोशी यांचा गणपती विसर्जन वेळी बुडून मृत्यू झाला होता. त्याचवेळी तत्कालीन नगराध्यक्ष निलेश भुरवणे आणि उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये यांनी अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी देवरुख मधील प्रमुख विसर्जन घाटावर लाईफ जॅकेट धारी युवक तैनात करण्याचा निर्णय घेतला होता.

साडवली ( रत्नागिरी ) - देवरुख बागवाडी येथे दुपारी गणेश विसर्जना दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने दोन तरुण बुडू लागले. या दोघांना नगरपंचायतीच्या सुरक्षा रक्षकांनी वाचवले. समीर प्रकाश मेस्त्री व सागर संतोष मेस्त्री अशा या दोघा तरुणांची नावे आहेत. 

येथील सप्तलिंगी नदीत गणपती विसर्जना दरम्यान ही घटना घडली. विसर्जन घाटावर असलेल्या नगरपंचायतीचे सुरक्षा रक्षक सुभाष कदम आणि आतिष कांबळे यांच्या लक्षात ही घटना आली. प्रसंगावधान साधत क्षणांचाही विलंब न करता लाईफ जॅकेट सहित असलेल्या आतिष यांनी पाण्यात उडी घेतली.

सुभाष यांनी रोप बुडणाऱ्यांच्या दिशेने फेकून त्यांना वाचविले. याच वेळी तिथे असलेल्या उपस्थित तरुणांपैकी सुरेश तावडे, सुभाष साबळे, विकास गजबर, गोटया मोग्रवणकर यांनी देखील स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नदीत उड्या घेऊन बुडणाऱ्यांना वाचवण्यासाठी मदत केली. 

तीन वर्षापूर्वी देवरुख मधील निनाद जोशी यांचा गणपती विसर्जन वेळी बुडून मृत्यू झाला होता. त्याचवेळी तत्कालीन नगराध्यक्ष निलेश भुरवणे आणि उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये यांनी अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी देवरुख मधील प्रमुख विसर्जन घाटावर लाईफ जॅकेट धारी युवक तैनात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेच आजची दुर्घटना टळली. 

दरम्यान नगराध्यक्षा मृणाल शेट्ये व उपनगराध्यक्ष सुशांत मुळे यांनी जीवाची पर्वा न करता बुडणाऱ्या युवकांचे प्राण वाचवणाऱ्या नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे इंजिनिअर चंद्रकांत गमरे यांचे आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Ganesh Devotee Re secure In Devrukh Ratnagiri Marathi News