मामा-भाच्याची 60 वर्षांपासून अनोखी प्रथा, संकटातही अव्याहतपणे सुरू 

दीपेश परब
Friday, 28 August 2020

गणेश चतुर्थीला प्रत्येक घरात माटवीखाली एकच गणपती दिसतो; मात्र तालुक्‍यातील उभादांडा-वाघेश्‍वरवाडी येथील (कै.) अनंत विठ्ठल केरकर यांच्या निवासस्थानी एकाच माटवीखाली मामा-भाचे यांच्या दोन गणेश मूर्तींचे पूजन होत आहे.

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - एका माटवीखाली आपल्याला सऱ्हासपणे एकाच गणपतीचे पूजन केल्याचे दिसते; पण येथे एकाच माटवीखाली मामा आणि भाचे, अशा दोन गणेश मूर्तींचे पूजन होत असून ही प्रथा 60 वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे. 

गणेश चतुर्थीला प्रत्येक घरात माटवीखाली एकच गणपती दिसतो; मात्र तालुक्‍यातील उभादांडा-वाघेश्‍वरवाडी येथील (कै.) अनंत विठ्ठल केरकर यांच्या निवासस्थानी एकाच माटवीखाली मामा-भाचे यांच्या दोन गणेश मूर्तींचे पूजन होत आहे. दिवंगत अनंत केरकर यांची बहिण सुगंधा मयेकर या मुंबई-लालबाग येथे आपल्या ब्लॉकमध्ये गणपतीचे पूजन करायच्या.

1958 मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे एवढ्या मोठ्या शहरात आपली बहिण आपल्या मुलासह एकटी कशी राहणार? या भितीने त्यांनी तिला माहेरी आणत आश्रय दिला; परंतु कितीही संकट आले तरी आपल्या गणेश पूजनाचे व्रत सोडायचे नाही, असे तिने ठरविले. तिच्या या संकल्पाला भावानेही प्रतिसाद दर्शवित तिचा गणपती वेगळ्या ठिकाणी न पूजता आपल्याच घरात आपल्या गणपतीच्या बाजूला पूजला.

1960 मध्ये पहिल्यांदा एकाच माटवीखाली दोन गणपतींचे पूजन झाले. तेव्हापासून आजपर्यंत ती परंपरा मामा आणि भाचे यांनी अविरतपणे सुरू ठेवली आहे. काही वर्षांत मोठे चक्रीवादळ निर्माण झाले. या वादळात दिवंगत अनंत केरकर यांचे रहाते घर जमिनदोस्त झाले. तरीही त्यांनी न डगमगता घराशेजारी भव्य मोठी झोपडी बांधली. यामध्ये त्यांनी आपल्या सर्व कुटुंबासमवेत काही महिने वास्तव्यही केले. याच दरम्यान, आलेल्या गणेश चतुर्थीमध्ये त्यांनी या झोपडीत दोन्ही गणपतींचे पूजन केले. एकाच माटवीखाली दोन गणपतींचे पूजन करण्याचे केरकर आणि मयेकर कुटुंबियांचे यावर्षीचे हे 60वे वर्ष आहे. दोन्ही कुटुंबिय मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गणपतींचे पूजन करीत आहेत. 

श्रद्धेने सेवा 
यापूर्वी दोन्ही कुटुंबियांनी 42 आणि 21 दिवस दोन्ही गणपतींची सेवा केली आहे. दिवंगत अनंत केरकर आणि दिवंगत सुगंधा मयेकर यांच्या निधनानंतरही ही दोन्ही कुटुंबे परंपरा जपत आहेत. मामा-भाच्यांची गणेशमूर्ती 25 वर्षे सिद्धेश्‍वरवाडी येथील श्रीकांत केरकर आणि बंधू घडवित आहेत. काल (ता.26) पाचव्या दिवशी या दोन्ही गणपतींचे विसर्जन झाले. दोन्ही गणपती हे आपलेच आहेत, अशा श्रद्धेने ही दोन्ही कुटुंबिय तन, मन आणि धन खर्च करुन दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतात. 

गणेश पूजनाची परंपरा मामामुळे खंडीत झाली नाही. कामानिमित्त मुंबईत असलो तरी दरवर्षी न चुकता चतुर्थीला येतो. कोरोनाच्या संकटातही या दोन गणपतींची सेवा करायला मिळाली हे भाग्य समजतो. गणेशआच्या आशीर्वादाने अखंड राहिलेल्या बहिण-भावाच्या नात्यामुळे त्यांच्या पश्‍चातही आमची पुढची पिढीही एकत्र राहिली आहे. 
- रामचंद्र शंकर-मयेकर 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Ganesh idols of Mama and nephew for sixty years