बिबट्याच्या हल्ल्यात रत्नागिरी तालुक्यात दोन तरुण जखमी

सुधीर विश्‍वासराव
सोमवार, 8 जुलै 2019

  • रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे-जाधववाडी येथील दोन युवकावर बिबट्याचा हल्ला
  • हल्ल्यात दोघेजण जखमी
  • बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात पुन्हा भीतीचे वातावरण. 

पावस - रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे-जाधववाडी येथील दोन युवकावर बिबट्याने हल्ला केल्याने दोघेजण जखमी झाले. त्यांना रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे या बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. योगेश विलास जाधव (वय 30) व विक्रांत दीपक जाधव (17) अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मावळंगे - जाधववाडी येथील योगेश व विक्रांत हे दोघे नामजोशीमार्गे गणेशगुळे फाटा येथे व्यायामशाळेत जाण्यासाठी दुचाकीवरून जात होते. सकाळी पावणेसात वाजता घरापासून काही अंतरावर जंगल भागातून जात असताना बिबट्याने त्याचा पाठलाग केला. त्यात दोघांनाही बिबट्याने नखाने ओरबाडल्याने दोघेही जखमी झाले. ही घटना समजताच वाडीतील लोक घटनास्थळी दाखल झाले. बिबट्या त्याच परिसरात फिरत असल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांनी या जखमी युवकांना पावस प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी संतोष कांबळे यांनी त्यांच्यावर उपचार करून त्यांना रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात पाठवले.

या घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर रेंजर प्रियांका लगट, वनपाल रवी गुरव, वनरक्षक मिताली कुबल, वनपाल महादेव पाटील, मावळंगे सरपंच वेदिका गुळेकर, सामाजिक कार्यकर्ते सुहास शिंदे, प्राणिमित्र प्रदीप डिंगणकर यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. 

यापूर्वीही कुर्धे, गणेशमुळे, मेर्वी या परिसरातील दुचाकीस्वारांवर बिबट्याचे हल्ले झाले आहेत. त्यातच आज पुन्हा मावळंगेतील दोन तरुणांवर हल्ला झाल्याने या परिसरात दिवसाही फिरणे मुश्कील झाले आहे.  वनविभागाने लावलेले सापळे यशस्वी ठरत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यासंदर्भात वनविभागाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two injured in Leopard attack in Ratnagiri Taluka