कोकण मार्गावर शुक्रवारपासून धावणार फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाड्या

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

दोन रेल्वेगाड्यांमुळे मुंबई व पुणेस्थित चाकरमान्यांना दिलासा 
मिळाला आहे.

रत्नागिरी : कोरोना हळूहळू नियंत्रणात येत असल्याने रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर एकामागोमाग एक रेल्वेगाड्या सोडण्यास प्रारंभ केला आहे. त्यानुसार २३ ऑक्‍टोबरपासून कोकण मार्गावर नागपूर-मडगाव व पुणे-मडगाव साप्ताहिक फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन रेल्वेगाड्यांमुळे मुंबई व पुणेस्थित चाकरमान्यांना दिलासा 
मिळाला आहे.

हेही वाचा -  निसर्गाच्या कोपाने बळीराजा सैरभैर -

दसऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर २१ पासून वास्को द गामा-पटना ही साप्ताहिक सुपरफास्ट फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाडी धावणार आहे. २१ डब्यांच्या या गाडीला पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडी स्थानकांवर थांबे दिले आहेत. पुणे-मडगाव फेस्टिव्हल स्पेशल २३, ३० ऑक्‍टोबर व ६ नोव्हेंबर या दरम्यान धावणार आहे.

पुणे येथून सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वा. मडगावला पोहचेल. परतीच्या प्रवासात मडगाव येथून सायंकाळी ४ वा. सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.५० वा. पुणे येथे पोहचेल. २२ डब्यांच्या या गाडीला लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आदी ठिकाणी थांबे  आहेत.

हेही वाचा - गोळवणचा बेपत्ता मुलगा सहा वर्षांनी सापडला -

नागपूर-मडगाव साप्ताहिकही धावणार

२३ व ३० ऑक्‍टोबर, ६ नोव्हेंबर या कालावधीत नागपूर-मडगाव साप्ताहिक फेस्टिव्हल स्पेशल गाडी धावणार आहे. नागपूर येथून सायंकाळी ४ वा. सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी मडगावला पोहचेल. परतीच्या प्रवासात मडगाव येथून सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ८.३० वा. नागपूरला पोहचेल. या गाडीला कोकण मार्गावर पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आदी स्थानकांवर थांबे आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two special train from konkan rail route in ratnagiri its beneficial to konkani people