सावंतवाडी तालुक्याला पुन्हा धक्का, दोघे शिक्षक कोरोना बाधित

भूषण आरोसकर
Tuesday, 11 August 2020

काल रात्री जाहीर केल्यानुसार तालुक्‍यात एकाच दिवशी तब्बल सहा कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील तालुक्‍याचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. काल रात्री येथील तालुक्‍यात आणखी सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली. यातील आंबोली येथे आढळलेले दोन रुग्ण हे चेकपोस्टवर ड्यूटीसाठी तैनात असलेले शिक्षक असल्याने एकच भीतीने गाळण उडाली आहे. अन्य चार रुग्ण हे दोन सातोसे येतील तर 2 चराठे येथील आहेत. 

वाचा - कणकवलीत कोविड रॅपिड अँटीजेन टेस्ट सेंटर उद्यापासून सुरू : वैभव नाईक  

जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा पाचशेच्या जवळपास पोहोचला असताना आता सावंतवाडी तालुक्‍याचा आकडा शंभरी पार करण्याच्या निकट आला आहे. काल रात्री जाहीर केल्यानुसार तालुक्‍यात एकाच दिवशी तब्बल सहा कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

यामध्ये चराठे व सातोसे या गावांत प्रत्येकी दोन दोन रुग्ण आढळले. ते क्वारंटाईन असल्याने भीतीची शक्‍यता कमी आहे; मात्र अन्य दोन रुग्ण हे शिक्षक असून ते आंबोली चेकपोस्ट येथे तैनात होते. त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले असता अहवाल पॉझिटिव्ह आला.

यातील एक शिक्षक आंबोली येथे वास्तव्यास होते तर दुसरे शिक्षक गडहिंग्लज कोल्हापूर येथून ड्युटीसाठी ये-जा करत असायचे. त्यांना तातडीने ओरोस येथे हलविले आहे. शासनाने शिक्षकांना चेक पोस्टवर ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांची नोंद करण्यासाठी ड्यूटी लावली आहे. यातील सर्वात पहिली शिक्षकांची बॅच.

हेही वाचा - शरद पवारांचा खंदा समर्थक भाजपमध्ये दाखल ; नारायण राणेंच्या बंगल्यावर झाला पक्षप्रवेश

आंबोली चेकपोस्ट येथे गेल्या काही दिवसांपासून कार्यरत आहे. या बॅचमधील दोन शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे या दोन्ही शिक्षकांच्या संपर्कात आलेल्यांची चाचपणी आज दिवसभरात सुरू होती. संपर्कात आलेल्यांनाही क्वारंटाईन करण्यात येणार आहे; मात्र हे दोन शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे ड्यूटीवरील कार्यरत असलेल्या अन्य शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. येथील तालुक्‍याचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आता 88 एवढ्या वर जाऊन पोहोचला आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two teachers covid positive in sawantwadi taluka konkan sindhudurg