भीषण अपघातानंतर युवती कोसळल्या नदीत

तुषार सावंत
Friday, 30 October 2020

या अपघातात धडकेनंतर दुसऱ्या दुचाकीवरील दोन युवक देखील बंधाऱ्यावर कोसळले; मात्र ते नदीपात्रात कोसळण्यापासून बचावले. अपघातानंतर एका जखमी युवतीला स्थानिकांनी उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले.

कणकवली (सिंधुदुर्ग) - कणकवली शहरालगतच्या गडनदी पात्रातील केटी बंधाऱ्यावर आज दुपारी 11.30च्या दरम्यान दोन दुचाकींमध्ये धडक झाली. यात एका दुचाकीवरील दोन युवती नदीपात्रात कोसळल्या. यातील एक युवती सिमेंटच्या भागावर आदळल्याने तिच्या डोक्‍याला आणि कंबरेला दुखापत झाली. तर दुसरी युवती थेट पाण्यात पडल्याने जखमी झाली नाही. पात्रात पाणी कमी असल्याने दोन्ही युवती बचावल्या. 

या अपघातात धडकेनंतर दुसऱ्या दुचाकीवरील दोन युवक देखील बंधाऱ्यावर कोसळले; मात्र ते नदीपात्रात कोसळण्यापासून बचावले. अपघातानंतर एका जखमी युवतीला स्थानिकांनी उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. तर ओसरगाव आणि कणकवलीतील राजकीय पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आपापसातील तडजोडीनंतर हे प्रकरण मिटवले. 

शहरातील एक युवती आपल्या मैत्रीणीला मालवण येथे सोडण्यासाठी दुचाकीवरून जात होती. तर ओसरगाव येथील दोन युवक मजूरीच्या कामासाठी गडनदीपात्रातील केटी बंधाऱ्यावरून कणकवलीच्या दिशेने येत होते. केटी बंधाऱ्यावर एकमेकांना बाजू देण्याच्या प्रयत्नात दोन्ही दुचाकी एकमेकांवर आदळल्या. यात एका दुचाकीवरील एक युवती थेट नदीपात्रात कोसळली. तर दुसरी बंधाऱ्याच्या पिलरला अडकून नदीपात्रात पडली.

अपघातानंतर नदीपात्रात मासे पकडत असलेल्या भोरपी बांधवांनी तातडीने धाव घेऊन दोन्ही युवतींना नदीपात्राबाहेर काढले. तर स्थानिकांनी एका जखमी युवतीला कणकवली उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, अपघाताचे वृत्त समजल्यानंतर शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. ओसरगाव आणि कणकवलीतील राजकीय नेतेमंडळींनी तडजोडीने हे प्रकरण मिटवले. मुंबई विद्यापिठाच्या पदवी परीक्षेत उत्तीर्ण झालेली युवती पेढे घेऊन मालवणला जात होती. वाटेत अपघात झाल्याने तिच्या आनंदावर विरजन पडले. बंधाऱ्यावर आणि नदीपात्रात बॉक्‍समधील पेढे विखुरले गेले होते. अपघातावेळी एका युवतीची पर्स आणि मोबाईल देखील नदीपात्रात वाहून गेला होता. त्याचा शोध स्थानिकांकडून सुरू होता. 

महिन्यात दोन अपघात 
गडनदी बंधाऱ्यावर पंधरा दिवसापूर्वी दुचाकीवरून सिलिंडर नेणारा तरूण दुचाकीसह नदीपात्रात कोसळला होता. त्यावेळी अतिवृष्टी असल्याने नदीपात्रात पूरस्थिती होती. मात्र त्या तरूणाला पोहता येत असल्याने तो बचावला होता. त्यांनतर आज पुन्हा केटी बंधाऱ्यावर दुचाकींमध्ये अपघात झाला. 

बॅरिकेट तोडून अवजड वाहतूक 
गडनदीपात्रातील बंधाऱ्यावरून कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीला मनाई करण्यात आली आहे. त्यादृष्टीने बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंनी बॅरिकेटही लावण्यात आले होते; मात्र दोन्ही बॅरिकेट अज्ञातांकडून तोडून टाकण्यात आले असून दुचाकींसह अवजड वाहनांची वाहतूक या बंधाऱ्यावरून होत आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two young women fell into the river in Kankavali accident