राऊत यांना पाडण्यासाठी प्रयत्न करणारे निष्ठावंत - उदय सामंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

uday samant on vinayak raut statement rebel shiv sena politics ratnagiri

राऊत यांना पाडण्यासाठी प्रयत्न करणारे निष्ठावंत - उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरीत काल माझ्या मतदार संघात शिवसैनिकांचा मेळावा झाला. या मेळाव्यात खासदार विनायक राऊत यांनी माझ्यावर चिडून टीका केली. मला त्यांना दोष द्यायचा नाही; पण आश्चर्य एवढेच वाटते की, जे लोक विनायक राऊत यांचा निवडणुकीत पराभाव व्हावा यासाठी प्रयत्न करत होते ते या मेळाव्यात निष्ठा व्यक्त करत होती. त्यांनाही काही बोलणार नाही. आजही मी शिवसेनेत आहे. घटकपक्षाच्या तावडीतून शिवसेना वाचवण्यासाठीचा हा उठाव आहे; पण तो विनायक राऊत यांना मान्य नाही. राऊत यांचा गैरसमज काही दिवसातच दूर होईल, अशी संयमी आणि आश्वासक प्रतिक्रिया आमदार उदय सामंत यांनी दिली.

शहरातील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात काल सायंकाळी शिवसेनेचा निर्धाळ मेळावा झाला. या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वांनी सेनेच्यापाठी ठाम उभा राहण्याचा निर्धार केला. काहींनी आपली होणारी गळचेपी आणि भडास या वेळी काढली. खासदार विनायक राऊत यांनीदेखील आमदार सामंत यांच्यावर जोरदार टीका केली. त्यावर सामंत यांनी मेळाव्यानंतर तत्काळ आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल केली.

उदय सामंत म्हणाले, माझ्या मतदार संघाचा सेनेचा मेळावा काल पाहिला. सुरवातीपासून शेवटपर्यंत जी भाषणे झाली ती व्यासपीठावरील पदाधिकाऱ्याने मला दाखवली. सर्वांची भाषणे ऐकली. मी त्यांच्या वक्तव्याबद्दल कोणाला दोष देणार नाही. खासदार विनायक राऊत यांचे भाषण ऐकले, ते चिडलेले आहेत. मी त्यांनाही दोष देणार नाही. एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला त्या उठावामध्ये मी सामिल झालो. सेनेला घटकपक्षाच्या तावडीतून सोडवण्यासाठी मी हा निर्णय घेतला; पण राऊत यांना ते मान्य नाही. म्हणून त्यांनी माझ्यावर टीका केली.

मी राग मानत नाही; पण आश्चर्य एवढेच की, जे लोक विनायक राऊत यांचा निवडणुकीत पराभाव व्हावा यासाठी प्रयत्न करत होते, त्यांनीही काल व्यासपीठावर निष्ठा व्यक्त केली. त्यांनाही काही बोलायचं नाही. आजही मी सेनेतच आहे. मला विनंती करायची आहे की, टीकेला मी उत्तर देणार नाही. मला राऊतसाहेबांनी अनेकवेळा मदत केली आहे. ते मी कधीच विसरणार नाही. एवढे आश्वासित करतो की, राऊत यांचा गैरसमच काही दिवसात दूर होईल. शिवसैनिकांना त्यांचा एक सहकारी म्हणून मी शुभेच्छा देतो.

...याला गद्दारी म्हणायचे की धाडस

ज्या व्यक्तींने वंदनीय बाळासाहेबांना जेलमध्ये पाठवण्याचा विचार केला, ज्या व्यक्तींने बाळासाहेबांची टी बाळू म्हणून टिंगल केली, त्या व्यक्तीच्या विरोधातील हा उठाव होता. हा उठाव होता, ज्यांनी शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना महाराष्ट्रात आपल्या शिवसेनेला चौथ्या क्रमांकावर नेलं. हा उठाव होता, ज्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मोक्का लावून जेलमध्ये टाकलं त्यांच्या विरोधात. हा उठाव होता, ज्यांनी वि. दा. सावरकर नावाला कायम विरोध केला त्याच्या विरोधात. हा उठाव होता, शिवसेना संपवू पाहणाऱ्या प्रवृत्तीचा. आता अशा उठावात मी माझ्या राजकीय कारकिर्दीचा विचार न करता सामिल झालो, याला गद्दारी म्हणाचे की, धाडस हे आपणच ठरवा, अशी साद सामंत यांनी शिवसैनिकांना घातली.

Web Title: Uday Samant On Vinayak Raut Statement Rebel Shiv Sena Politics Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top