esakal | 'अशा' लोकांची रत्नागिरीला गरज नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

uday samant suggest to MSEB officer about contractor in ratnagiri

ठेकेदारासह त्याला पाठिंबा देणाऱ्या त्या अधिकाऱ्याची एका समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा

'अशा' लोकांची रत्नागिरीला गरज नाही'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा मंडणगड, दापोली तालुक्‍याला मोठा तडाखा बसला. या नैसर्गिक आपत्तीत स्थानिकांबरोबर परजिल्ह्यातून लोक येऊन त्यांनी मदत केली; मात्र मदत सोडाच, जास्त पैसे मिळण्यासाठी ब्लॅकमेल करीत महावितरणचे दुरुस्तीचे काम ठेकेदाराने बंद केले. त्या ठेकेदारासह त्याला पाठिंबा देणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्याची चौकशी करा. प्रसंगाला धावून न येणारे ठेकेदार जिल्ह्यात नकोत. समिती नेमून चौकशी करून दोघांवर कारवाई करा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. महावितरण कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. 

हेही वाचा - चाकरमान्यांचा गणेशोत्सव यंदा मुंबईतच; ई-पाससाठी पोलिसांकडे केवळ 4 हजार अर्ज

जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. किनारी भागातील मंडणगड, दापोली तालुक्‍याला याचा मोठा फटका बसला. घरांची छप्परे उडाली, झाडे उन्मळून पडली, विद्युत खांब मोडले, विद्युत वाहिन्या तुटल्या, बागा उद्‌ध्वस्त झाल्या. वादळामुळे दोन्ही तालुक्‍यांची वाताहत झाली. अनेक संसार उघड्यावर पडले. महावितरण कंपनीचे यामध्ये सुमारे ३५ कोटींच्या घरात नुकसान झाले. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी दोन महिने गेले. मदतीसाठी रत्नागिरीच नव्हे, तर इतर जिल्ह्यातील महावितरणची पथके, स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था आदी जिवाचे रान करून राबत होते. मदतीसाठी हजारो हात पुढे येत होते. माणुसकीचे दर्शन होत होते. 

मात्र, महावितरणने दुरुस्तीसाठी नेमलेल्या एक ठेकेदाराने या परिस्थितीत मदत सोडा, तर जादा पैसे मिळण्यासाठी काम बंदचा पवित्रा घेतला. या मागे महावितरणच्या एका अधिकाऱ्याने त्याला जास्त पैसे मिळविण्यासाठी ही फूस लावल्याचे समजते, असे सामंत यांनी बैठकीत स्पष्ट केले. जिल्ह्यात ही प्रवृत्ती चांगली नाही. त्या ठेकेदारासह त्याला पाठिंबा देणाऱ्या त्या अधिकाऱ्याची एका समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, अशा सूचना सामंत यांनी महावितरणचे मुख्य अभियंता सायनेकर यांना दिल्या. 

हेही वाचा -  लॉकडाउनमध्ये शेतीकडे वळलेला युवावर्ग हताश, जाणून घ्या कारण...

महावितरणचे कौतुक 

निसर्ग चक्रीवादळामध्ये महावितरण कंपनीचे सुमारे ३५ कोटींचे नुकसान झाले आहे; परंतु ग्राहकाला केंद्रबिंदू मानून लवकरात लवकर विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणने शर्थीचे प्रयत्न केले. त्यांचे हे काम खरोखर कौतुकास्पद आहे, अशी शाबासकीची थाप उदय सामंत यांनी मारली.

संपादन - स्नेहल कदम 

loading image