आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी गावकुसाबाहेरच्यांना माणसात आणणारी कोकणातील दुर्गा

रूपेश हिराप
Wednesday, 21 October 2020

कातकरी समाजाला हक्काचे जीवन देण्याच्या लढाईत उतरलेल्या
उजा आईर

सिंधुदुर्ग : आदिवासी कातकरी हा गावकुसा बाहेरचा समाज. त्यांना माणसात आणणे सोपे नाही; पण या समाजाला आपलस बनवत त्यांच्या अडीअडचणी समजून घेत त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या नवर्‍याच्या खांद्याला खांदा लावून आयुष्य पणाला लावणार्‍या कुसगाव (ता.कुडाळ) येथील सौ. उजा उदय आईर यांचा संघर्ष सामाजिक कार्याच्या क्षेत्रात मार्गदर्शकच आहे. कित्येक पिढ्या वानरमारे या नावाने रानावनात, मुख्य वस्तीपासून दूर उपेक्षित आयुष्य जगणार्‍या जिल्ह्यातील या कातकरी समाजाला हक्काचे जीवन देण्याच्या लढाईत उतरलेल्या सौ. उजा या खर्‍या अर्थाने दुर्गा ठरल्या आहेत.
 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातकरी समाज हा आदिवासी जमातीतील एक आहे. जिल्ह्यात देवगड, कुडाळ, मालवण, कणकवली, वेंगुर्ले या तालुक्यात विखरुन हा समाज गेली कित्येक वर्ष राहत आहे. वानरमारे अशी यांची जिल्ह्यातील ओळख. हा समाज इतर प्रगत समाजापासून पिढ्यानपिढ्या कोस दूर जंगलाच्या पायथ्याशी, नदीकाठी राहत आला आहे. त्यांच्या अंगाला येणारा घाण वास व त्यांचे विचित्र राहणीमान, अस्वच्छता यामुळे काही वर्षापुर्वीपर्यंत त्यांना किळसवाण्या नजरेनेच पाहिले जायचे. त्यांना दुय्यम वागणूक मिळत आली; मात्र या समाजाला माणसात आणण्यासाठी उदय आईर यांनी आपले आयुष्य पणाला लावले. त्यांना आतापर्यंत त्यांचे कित्येक हक्क मिळवून दिले. उदय यांच्या अर्धांगिनी असलेल्या सौ. उजा यांनी हे कार्य मोठ्या मनाने स्विकारले. आज आईर दाम्पत्य या समाजासाठी देवदूत ठरत आहे.

सौ. व श्री. आईर गेली कित्येक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातकरी समाजासाठी झटत आहेत. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी वेताळ बांबर्डे कदमवाडी (ता.कुडाळ) याठिकाणी शोषित मुक्ती अभियान या नावाची संस्थाही त्यांनी स्थापन केली आहे. दानशूर व्यक्तीकडून मिळणारी मदत व प्रसंगी पदरमोड करून आईर दाम्पत्य हे कार्य पुढे नेत आहे.जिल्ह्यातील कातकरी समाजाची परिस्थिती 2007 पूर्वी भयानक कशी होती. अन्न, पाणी, निवारा यामुळे हा समाज इकडे तिकडे भरकटत होता. भूकबळीचे प्रमाण मोठे होते. व्यसनाधिनता तर पुरूषा बरोबर तर महिलांमध्ये होती. आश्‍चर्य म्हणजे मोठ्या प्रमाणात असणार्‍या या समाजाची नोंदच सिंधुदुर्गाच्या प्रशासनामध्ये नव्हती. त्यावेळी उदय आईर यांनी सर्वप्रथम या कातकरी समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला. त्यांची भाषा समजून घेतली.

हेही वाचा- पंचवीस वर्षापासून पतीचा हात हातात घेऊन दृष्टीहिन पतीचा आधार बनली इंदिरा -

2011 मध्ये आईर यांचे लग्न झाले. त्यानंतर पत्नी उजा यांनीही त्यांच्या कार्यात झोकून घेतले. त्या स्वतः उच्चशिक्षित असुन समाजसेवेची (एमएसडब्लू) पदवीही त्यांनी मिळविली आहे. आज पतीसोबत कातकर्‍यांबरोबर काम करताना त्यांच्या मुला बाळांमध्ये मिळून मिसळून त्यांचे राहनीमान उंचावण्याचे काम त्या करत आहेत. मुख्य म्हणजे या समाजातील मुला-मुलींना उच्च शिक्षीत बनवण्याचा त्यांचा मानस असून त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ते जिल्ह्यातील कातकरी समाजाच्या वस्त्यांमध्ये जाऊन त्यांच्या मुलांना तोंडाला ब्रश लावण्यापासून आंघोळ घालण्यापर्यंत सर्व कामे स्वतः करतात.

संस्थेच्या माध्यमातून या समाजातील मुलांना शिक्षणही देत आहेत. एक हॉस्टेलही सुरू केले असून त्या मुलांची येथे देखभाल करण्याची प्रमुख जबाबदारी उजा या पार पाडतात. स्वतः त्यांच्या वस्त्यावर जाऊन त्यांचे क्लास घेण्याबरोबरच त्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य त्या पुरवतात. महिलांमध्ये जनजागृती निर्माण करणे, व्यसनमुक्ती अभियान राबवणे, अधिकार्‍यांसमोर उभे राहण्याबरोबरच त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडायला शिकवणे, गरोदर महिला किशोरवयीन महिला यांच्यासाठी आरोग्य शिबिरे, त्यांना येणार्‍या समस्यांबाबत मार्गदर्शन करणे असे विविध उपक्रम त्या राबवित आहेत.

त्सुनामीचा संदेश आला अन् गावकऱ्यांचा एकच गोंधळ उडाला -

लहान मुलांसाठी बाल मेळावे, स्पर्धा दरवर्षी घेत आहेत. त्यासाठी सावली ट्रस्ट व दानशूर व्यक्तींची वेळोवेळी मदत त्यांना मिळत आहे. आज जिल्ह्यात पाच ठिकाणी व रस्त्यावर अभ्यास वर्ग त्यांनी सुरू केला आहे. विशेष म्हणजे कोरोनासारख्या काळातही त्यांनी त्यांच्या वस्तीवर शिक्षणाचे कार्य अविरत सुरू ठेवले आहे.
सौ आईर यांचे काम इथेच संपत नसून या समाजाला शासनाकडील त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देताना घर, जमिन, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र आदी मिळवून दिले आहे. त्यांनी केलेल्या जनजागृती अभियान, बाल मेळावे यामुळे पूर्वी असलेले महिला पुरुषांमधील दारूचे प्रमाण आता नगण्य राहिले आहे. शिवाय पूर्वीपेक्षा आज हा समाज ताठ मानेने व न भिता इतर समाजाच्या बरोबर जीवन जगत आहे.

“माणसाच्या आयुष्यात एक तरी ध्येय असावे. एक असे ध्येय जे तुम्हाला इतरांसाठी काम करायला प्रोत्साहीत करेल. इतरांसाठी काम करण्यात जो आनंद आहे तो दुसरा कशातही नाही. त्यामुळे कातकरी समाजासाठी आम्ही हाती घेतलेले कार्य अविरत सुरू ठेवणार आहोत; मात्र या समाजाकडे इतर समाजाने बघण्याचा दृष्टिकोन बदलावा.”
- उजा आईर

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uja Iyer navratr festival sepcial story by rupesh hirap sindhudurg