esakal | पालिका कर्मचार्‍याकडूनच अनधिकृत बांधकाम
sakal

बोलून बातमी शोधा

Unauthorized construction by chiplun municipal employees

पाग गोपाळकृष्णवाडी येथील जागा मालक प्रथमेश कापडी यांनी यासंदर्भात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे

पालिका कर्मचार्‍याकडूनच अनधिकृत बांधकाम

sakal_logo
By
मुझफ्फर खान

चिपळूण -चिपळूण शहरातील अनधिकृत बांधकामावर पालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. मात्र प्रशासनातील एका कर्मचार्‍याने पाग गोपाळकृष्णवाडी येथील खासगी जागेत अनधिकृत बांधकाम केेले आहे. ते तोडण्यासाठी जागा मालक दीड वर्षापासून पालिकेचे उंबरटे झिजवत आहे. त्याकडे पालिका प्रशासन दुलर्क्ष करीत असल्यामुळे पालिकेच्या विरोधात उपोषण करण्याचा इशारा जागा मालकाने दिला आहे. 


पाग गोपाळकृष्णवाडी येथील जागा मालक प्रथमेश कापडी यांनी यासंदर्भात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. या तक्रारीत असे म्हटले आहे की, पालिकेतील समिती लिपिक संतोष बापूजी शिंदे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी पागगोपाळकृष्ण वाडीतील माझ्या खासगी जागेत अनधिकृत बांधकाम केले आहे. बांधकाम करण्यासाठी त्यांनी पालिकेकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही. शिंदे यांनी पालिकेतील पदाचा गैरवापर करीत स्वतःच्या नावाचा बोगस असेसमेंट उतारा तयार केला. त्याचा वापर वीज कनेक्शन मिळण्यासाठी केला. शिंदे जागेचे भोगवटादार नसताना पालिकेने कोर्‍या अर्जाच्या आधारे त्यांना घरपट्टी व असेसमेंट उतारा तयार करून दिला आहे. त्याचा वापर शिंदे यांनी निरनिराळ्या शासकिय, निमशासकीय संस्थांमध्ये सर्व सेवा उपलब्ध मिळविण्याकरिता केला. या गंभीर प्रकरणाची माहिती मुख्याधिकारी यांना देण्यात आली. त्यांनी कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर तत्कालीन मुख्याधिकारी यांच्या स्वाक्षर्‍यांनी दस्ताऐवज तयार करण्यात आले आहे.

विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून भरत मारुती रेडीज यांनी कागदपत्रांवर सत्यप्रत म्हणून सही शिक्का दिला आहे. मात्र या कागपत्रांची नोंद पालिकेत नाही. अशी लेखी माहिती कापडी यांना माहिती अधिकार कायद्याअंतर्गत पालिकेकडून देण्यात आली आहे. त्यानंतर कापडी यांनी मुख्याधिकार्‍यांची भेट घेवून बनावट कागदपत्रांबाबत चर्चा केली मात्र पालिकेकडून दुलर्क्ष करण्यात आल्याने कापडी यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली आहे. संतोष शिंदे व त्यांच्या कुटूंबियांवर फौजदारी स्वरूपचा व दंडनीय कारवाई करण्यात यावी. अशी मागणी त्यांनी पोलिस निरिक्षक देवेंद्र पोळ यांच्याकडे केली आहे. त्यानूसार पोळ यांनी चौकशीचे आदेश देत उपनिरिक्षक वायंगणकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.  

 
संपादन - धनाजी सुर्वे