पंचायत समिती उपसभापतींची घरासमोरील मोटार मध्यरात्रीत फोडली....घडले कुठे वाचा

अनिल निखार्गे
Thursday, 23 July 2020

सध्या शिरोडा गावात पार्टी विषयावरून जोरदार रणकंदन सुरू आहे. 

शिरोड (जि. सिंधुदुर्ग) : येथील रहिवासी आणि वेंगुर्ले पंचायत समितीचे उपसभापती सिद्धेश ऊर्फ भाई परब यांची मोटार गुरूवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास दगड व दारूच्या बॉटल मारून फोडली. यामुळे शिरोडा येथील वातावरण तापले. काही दिवसापूर्वी येथे कोरोना कालावधीत झालेली पार्टी वादाचे कारण बनली होती. या पाठोपाठ घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. 

शिरोडा येथील आपल्या घराच्या कंपाउंडमध्ये श्री. परब यांची ही गाडी उभी होती. मध्यरात्री अनोळखी व्यक्तींनी ही गाडी समोरच्या बाजूने दगड मारून फोडून नुकसान केले. याबाबत स्थानिक पोलिस तसेच वेंगुर्ले पोलिसांना माहिती देण्यात आली आहे, असे श्री. परब यांनी सांगितले.

सध्या शिरोडा गावात पार्टी विषयावरून जोरदार रणकंदन सुरू आहे. येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात एक पार्टी झाल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कोरोना काळातील आदेशांचा यात भंग झाल्याचा आरोप होत होता. सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणी माफी मागितली. त्यानंतर यावर तोडगा निघत असतानाच आता हा गाडी फोडण्याचा प्रकार घडल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. 

या कृत्याचा जिल्हा परिषद माजी आरोग्य व शिक्षण सभापती तथा विद्यमान सदस्य प्रितेश राऊळ, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांच्याकडून तीव्र निषेध केला आहे. प्रितेश राऊळ यांनी याबाबत सिद्धेश परब यांची भेट घेतली. तसेच शिरोडा पोलिस स्थानकात पोलिस उपनिरीक्षक रुपाली गोरड यांची भेट घेऊन योग्य तपास करून लवकरात लवकर दोषींवर कारवाईची मागणी केली. या वेळी शिरोडा ग्रामपंचायत माजी सदस्य मयुरेश शिरोडकर, माजी तंटामुक्त अध्यक्ष अमित गावडे, रितेश परब आदी उपस्थित होते. 

अशा हल्ल्यांना घाबरत नाही 
माझा लढा हा कोणाशी वैयक्तिक नसून वाईट प्रवृत्तीच्या विरोधात आहे. आणि असे हल्ले करून मी खचून जाईन असे जर कोणाला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. मी अशा हल्ल्यांना घाबरत नसून, आपला लढा हा पुढे सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया सिद्धेश परब यांनी व्यक्त केली आहे. 

भ्याड हल्ला करणाऱ्यांना शोधा 
उपसभापती सिद्धेश परब यांच्या मोटारीचे नुकसान करण्याचा जो प्रयत्न झाला आहे, हे भ्याड कृत्य असून ज्या कोणी अज्ञाताने हे कृत्य केले आहे त्याचा लवकरात लवकर पोलिस तपास होऊन शिक्षा व्हावी. मी या भ्याड कृत्याचा निषेध करतो, अशी प्रतिक्रिया शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी दिली आहे. 

संपादन ः विजय वेदपाठक
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unknown persons attacked Panchayat Samiti Deputy Speaker's car