अवैध धंद्यांवर कारवाईसाठी महिन्याची डेडलाईन 

भूषण आरोसकर
Tuesday, 13 October 2020

कणकवली तसेच सावंतवाडी कार्यलयावर मनसेतर्फे मोर्चे काढण्यात येतील, असा इशारा मनसे कोकण संघटक परशुराम उपरकर यांनी आज दिला. 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाला एक महिन्यांचा अवधी दिला आहे. वेळीच या धंद्यांना लगाम न घातल्यास जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच दोन्ही उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या कणकवली तसेच सावंतवाडी कार्यलयावर मनसेतर्फे मोर्चे काढण्यात येतील, असा इशारा मनसे कोकण संघटक परशुराम उपरकर यांनी आज दिला. 

माजगाव सिद्धिविनायक सभागृहात येथील तालुका मनसे पदाधिकाऱ्यांच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष धीरज परब, तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, शहराध्यक्ष आशिष सुभेदार, ऍड. अनिल केसरकर, संतोष भैरवकर आदी उपस्थित होते.

उपरकर म्हणाले, ""जिल्हा पोलिसांच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात अवैध धंद्याचे जाळे वाढतच आहेत. त्यामुळे युवा पिढी बरबाद होत आहे. मळगाव येथील गीतांजली मळगावकर खून प्रकरणातील संशयितही अवैध धंद्यांशी संबंधित आहेत. नूतन जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कारवाईचे आश्‍वासन दिले आहे. त्यांनी तत्काळ कारवाईची मोहीम हाती घ्यावी, अन्यथा वेळप्रसंगी आंदोलन करू.'' 

यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, जिल्हा सचिव बाळा पावसकर, परिवहन जिल्हाध्यक्ष ऍड. राजू कासकर, उपजिल्हाध्यक्ष दत्ताराम गावकर, माजी उपजिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, कार्याध्यक्ष परिवहन संतोष भैरवकर, तालुकाध्यक्ष गुरूदास गवंडे, शहराध्यक्ष आशिष सुभेदार, मनविसे तालुकाध्यक्ष ओंकार कुडतरकर, तालुका सचिव विठ्ठल गावडे, माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे, नरेश देऊलकर, सुधीर राऊळ, वसई विरार विभाग अध्यक्ष अरविंद गावडे, सुरेंद्र कोठावळे, बाळा बहिरे, आदेश सावंत, नाना सावंत, निलेश मुळीक, महादेव पेडणेकर, श्रीराम सावंत, चंद्रकांत परब, प्रज्वल गावडे, ललिता नाईक आदी उपस्थित होते. 

ते म्हणाले, ""परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्‍यात मनसेतर्फे प्रशासनाला निवेदने दिली जाणार आहेत. लॉकडाउनमध्ये बचतगट, छोटे उद्योग थंड पडले आहेत. त्यामुळे बचतगटांना अल्प व्याज दरात कर्जे देऊन महिलांना सक्षम करावे तर उद्योगधंद्यांसाठी कर्ज सवलत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे'' 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uparkar said, Take action against the illegal trade in konkan