अजब! मूर्ती साकारण्यासाठी वापरले साठ किलो तुप, लक्षवेधी देखावा

अनिल निखार्गे
Tuesday, 1 September 2020

तूपाची मूर्ती खडविणे ही प. पू. पोळजीकाका यांची खासियत आहे. अगदी सहजपणे आणि एक-दीड दिवसांत दोन चार नव्हे तर तब्बल पन्नास-साठ किलोची तुपाची मूर्ती गेली बरीच वर्षे घडवीत आहेत.

शिरोडा (सिंधुदुर्ग) - ज्येष्ठ देशभक्‍त प. पू. हरेकृष्ण पोळजीकाका हे गणेशोत्सवानिमित्ताने गेली बरीच वर्षे त्यांच्या आसोली (ता. वेंगुर्ले) येथील निवासस्थानी विविध पौराणिक कथानकावर आधारीत देखावा साकारतात. त्यात तूपाची मूर्ती हे खास आकर्षण असते. यावर्षी त्यांनी मच्छीद्रनाथ जन्म मूर्ती तुपाची घडविली आहे. 

तेल, तूप हे द्रवरूप पदार्थात मोडते. तूपाची मूर्ती खडविणे ही प. पू. पोळजीकाका यांची खासियत आहे. अगदी सहजपणे आणि एक-दीड दिवसांत दोन चार नव्हे तर तब्बल पन्नास-साठ किलोची तुपाची मूर्ती गेली बरीच वर्षे घडवीत आहेत. आणि ती बघण्यासाठी भाविकांची, रसिकांची गर्दी होत असते. श्री गुरु परंपरा थोर मानून त्यांनी यंदा तब्बल साठ किलो तुपाची मच्छिंद्रनाथ जन्म मूर्ती घडविली आहे. प. पू. पोळजी काका सांगतात, ""आदिनाथ गुरू (दत्त) सकळ सिद्धांचा। मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य।। मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला। 
गोरक्ष वोवला खार चोजविले।।'' 

नृसिंहवाडीतून तूप 
या मूर्तीसाठीचे तूप कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडीतून पाच महिन्यांपूर्वी आणले होते आणि विशेष म्हणजे हे तूप एका गुजराती भक्‍ताने पुरविले होते. हा देखावा अनंत चतुर्दशीपर्यंत असतो. त्या दिवशी श्री गणराज मूर्तीचे विसर्जन झाल्यावर ही तुपाची मूर्ती उन्हात ठेवतात आणि वितळणारे तूप डब्यात साठवून वर्षभर दिवाबत्तीसाठी वापरतात, असेही प. पू. पोळजीकाका यांनी अभिमानाने सांगितले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use ghee to make idols asoli vengurla konkan sindhudurg