
रत्नागिरी - जिल्ह्यातील 16,783 ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्डचे वाटप केले आहे. त्यामुळे ज्येष्ठांची प्रवासादरम्यान मतदान कार्ड, आधारकार्डापासून सुटका होणार आहे. या स्मार्ट कार्डला रिचार्ज केले तर प्रवाशांना प्रवासादरम्यान पैसेही बाळगण्याची गरज राहणार नाही.
एसटी महामंडळाला खासगी वहातुकीचा फटका बसत आहे. प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्मार्ट कार्ड देण्यात येत आहे.
एसटीने प्रवास करताना ज्येष्ठांना तिकिटाच्या दरात सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे शहरी, ग्रामीण भागांतील ज्येष्ठ नागरिकांचा बसद्वारे प्रवास करण्याकडे अधिक कल असतो. राज्य परिवहन महामंडळाने डिजिटलायझेशन स्वीकारून स्मार्ट कार्डची योजना अंमलात आणली आहे. स्मार्ट कार्ड तयार करण्यासाठी ज्येष्ठांना 55 रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. ऑनलाईन नोंदणीनंतर आधार कार्डशी लिंक करण्यात येणार आहे.
त्यानंतर 10 ते 15 दिवसांत संबंधितांना स्मार्ट कार्ड आगारातून देण्यात येणार आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी कोठे व किती किलोमीटरचा प्रवास केला, याची माहिती एका क्लिकवर महामंडळाकडे उपलब्ध होणार आहे. यापूर्वी ज्येष्ठांसाठी अर्ध्या तिकीट दरावर 4 हजार किलोमीटर प्रवासाची मर्यादा होती. मात्र, केवळ मतदानकार्ड, आधारकार्ड पाहून प्रवाशांना तिकिटे दिली जात होती. कोणी किती प्रवास केला, याची माहिती महामंडळाला मिळू शकत नव्हती. मात्र, आता ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्ड मशीनद्वारे स्वाईप करून प्रवास केल्यानंतर प्रवाशांच्या किलोमीटरची माहिती महामंडळाकडे संकलित होणार आहे.
वर्षाच्या आत 4 हजार किलोमीटरची मर्यादा संपली, तर मात्र संबंधित ज्येष्ठ नागरिकाला तिकिटाचा पूर्ण दर देऊन प्रवास करावा लागणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 16,783 ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले आहे.
तालुका..................स्मार्ट कार्ड
दापोली...................2133
खेड.......................1567
चिपळूण.................2440
गुहागर...................2027
देवरुख...................2590
रत्नागिरी...............1520
लांजा.....................1724
राजापूर..................1177
मंडणगड................1605