सागरी सुरक्षेची पकड होणार आणखी मजबूत ; १५ दिवसांत दोन स्पीड बोटी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

एकूण ८ स्पीड बोटींद्वारे जिल्ह्याच्या सागरी किनाऱ्याची सुरक्षा केली जाईल.

रत्नागिरी : सागरी सुरक्षा अतिशय महत्त्वाची आहे. मी याचा आढावा घेतल्यावर अनेक बाबींचा यापूर्वी पाठपुरावा झाला नसल्याचे निदर्शनास आले. आता सागरी पोलिस ठाणी सक्षम केली जातील. मच्छीमारांची सुरक्षेसाठी मदत घेतली जाईल. आठपैकी सहा स्पीड बोटी कार्यरत आहेत. त्यात आणखी दोन स्पीड बोटी १५ दिवसांत दाखल होऊन प्रभावी गस्त घातली जाईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहित गर्ग यांनी दिली. 

हेही वाचा - रत्नागिरीकर तुमच्यावर आता सीसीटीव्हीची नजर -

पत्रकारांशी चर्चेवेळी त्यांनी ही माहिती दिली. कोकण किनारपट्टी ही सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आहे. १९९३ मध्ये रायगड किनाऱ्यावर स्फोटके सापडली होती. त्यानंतर मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील अतिरेक्‍यांनी मुंबईत प्रवेश करण्यासाठी सागरी मार्गाचा वापर केला होता. अतिरेकी कारवाया रोखण्यासाठी सागरी गस्त कडक केल्याच्या अनेक घोषणा झाल्या. समुद्र मार्गाने येणाऱ्या शत्रूंवर करडी नजर ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून राज्य सरकारने पोलिसांना दहा स्पीड बोटी देऊन सागरी सुरक्षा मजबूत केली.

जिल्हा पोलिसांची मजबूत असलेली सागरी सुरक्षेची पकड ढिली झाल्याची परिस्थिती होती; मात्र नवीन पोलिस अधीक्षक गर्ग यांनी यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. सागरी सुरक्षेसाठी पोलिस दलाकडे ९ स्पीड बोटी आहेत. त्यापैकी १ स्पीड बोट पूर्णतः खराब झाली आहे. सहा स्पीड बोटींआधारे गस्त सुरू आहे. आणखी दोन स्पीड बोटींची दुरुस्ती सुरू असून, येत्या पंधरा दिवसांत त्या सागरी गस्तीसाठी कार्यरत होतील. एकूण ८ स्पीड बोटींद्वारे जिल्ह्याच्या सागरी किनाऱ्याची सुरक्षा केली जाईल. सागरी कृतिदल आणि मच्छीमारांनाही या सुरक्षेच्या कामासाठी पोलिसांबरोबर सामील करून घेतले जाईल.

हेही वाचा - वैभववाडी तालुका कोरोनामुक्त

विशेष तपशील

- १६७ किमी सागरी किनारा
- ४२१ किमी खाडीकिनारा
- सागरी किनारी ११ बंदरे
- १० सागरी पोलिस ठाणी  

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: use of speed boat to fishing and patrol in sea beach in ratnagiri as per the police officers rules