esakal | या गावात दगड वापरायला बंदी आहे ! गावात दगडी बांधकाम केलेले घर औषधालाही नाही सापडणार 
sakal

बोलून बातमी शोधा

use of stones is prohibited in village

गावात पूर्वापार स्थित असलेल्या नागरिकांना गावची दंतकथा माहिती असल्यामुळे कोणीही जाणून बुजून घरकामात दगड वापरण्याचे धाडस करत नाही.

या गावात दगड वापरायला बंदी आहे ! गावात दगडी बांधकाम केलेले घर औषधालाही नाही सापडणार 

sakal_logo
By
भूषण आरोसकर

या गावात तुम्हाला दगडी बांधकाम केलेले घर औषधालाही सापडणार नाही. माती आणि विटांची सुबक घरे हे इथले वैशिष्ट्य. या गावचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीदेव रामेश्‍वराचे मंदिर मात्र दगडातील वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिराशी जोडलेल्या आख्यायिकेमुळे गावात दगडाचे घर उभारले जात नाही. ही परंपरा कित्येक पिढ्या जपली आहे. सावंतवाडीपासून अवघ्या 6 किलोमीटरवर असलेले आकेरी-हुमरस (ता. कुडाळ). 
आकेरी आणि हुमरस ही आता दोन गावे म्हणून ओळखली जातात. त्यांच्या ग्रामपंचायती वेगळ्या आहेत; मात्र पूर्वी ही दोन्ही गावे मिळून एकच गाव होते आणि बांधकामात दगड न वापरण्याची परंपरा आजही या दोन गावांत जपली जाते.

 
माणगावला जाणाऱ्या मार्गाशेजारीच श्री देव रामेश्‍वर मंदिराचे बांधकाम झाले. त्यावेळी मंदिराच्या बांधकामासाठी लागणारा दगड देवगडवरून बैलगाडीतून आणला होता. श्री रामेश्‍वरावर आकेरीवासीयांची मोठी नितांत श्रद्धा असून, आपल्या मंदिराचे बांधकाम दगडी असल्यामुळे देवापेक्षा मोठे कोणी असू नये, या विचारधारेने गावात कोणीही आपल्या घराला दगड वापरणार नाही, असा शब्द मानकाऱ्यांनी मंदिरात देवासमोर दिला. त्यानंतर ते आजतागायत गावात कोणीही स्थायिक झालेली व्यक्ती आपल्या वास्तूला दगड वापरत नाही. त्यामुळे गावातील सर्वच घरांचे बांधकाम विटांपासून झालेले आहे. अलीकडे स्लॅबची घरे बांधणारे सिमेंटच्या ब्लॉकचा वापर करतात. श्रीदेव रामेश्‍वराच्या तुलनेत कोणतीच गोष्ट मोठी असू नये. तसे करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्याला गावात स्थिरता लाभत नाही, त्याची हानी होते, अशा पूर्वीपासून चालत आलेल्या आख्यायिकेनुसार आकेरी व हुमरसवासीय दगडी बांधकाम करत नाहीत. गावात दगडी बांधकाम करण्याचे ज्यांनी प्रयत्न केले त्यांना तशी वेगळी प्रचीती किंवा वेगळेच अनुभव आले असल्याचा दावा ग्रामस्थ करतात. त्यामुळे दगडी घरे नसलेला गाव म्हणून आकेरी-हुमरसचा नावलौकिक सर्वदूर आहे. 

पूर्वी आकेरी व हुमरस हे कुडाळ तालुक्‍यातील एकच गाव होते; मात्र नंतर काही कारणास्तव आकेरी व हुमरस असे दोन भाग करण्यात आले. आकेरी गावची लोकसंख्या 3 हजारांच्या आत आहे. गावचे दोन भाग झाल्यानंतरही दोन्ही गावांत देवाच्या दंतकथेनुसार दगडी बांधकाम करण्यास कोणीही तयार होत नाही. माणगावचे खोरे जवळच असल्यामुळे निसर्गाच्या कुशीत मुंबई-गोवा महामार्गावरच ही गावे आहेत. इथल्या स्थायिकांचा प्रमुख व्यवसाय शेती असल्यामुळे पावसाळ्यात गावाचे सौंदर्य विशेष खुलून दिसते. गावात सर्वांचीच घरे विटांची असल्यामुळे लगतच्या कोलगाव, आंबेगाव येथे वीट व्यवसाय जोरात चालतो. 
ग्रामस्थांची घरे दगडी नसली तरी गावातील शासकीय यंत्रणेची कार्यालये म्हणजे ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, प्राथमिक उपकेंद्रे आदींच्या बांधकामाला दगड वापरला गेला आहे. 

कोकणपण आजही टिकून
गावात पूर्वापार स्थित असलेल्या नागरिकांना गावची दंतकथा माहिती असल्यामुळे कोणीही जाणून बुजून घरकामात दगड वापरण्याचे धाडस करत नाही. इतर गावातून येथे स्थायिक होण्यास कोणी आल्यास त्याला स्थानिक नागरिक गावची दंतकथा व श्रीदेव रामेश्‍वराची महती ते स्पष्ट करून सांगतात. हे गाव शहरापासून जवळ आहे; मात्र दगडाचा वापर होत नसल्याने येथे निवासी संकुले किंवा फारसे सिमेंटीकरण झालेले नाही. त्यामुळे गावचे कोकणपण आजही टिकून आहे. 
 
""गावावर श्री देव रामेश्‍वराची कृपा कायम आहे. गावात चालत आलेल्या दंतकथेनुसार आजपर्यंत दगडी बांधकाम झालेले नाही. हे आमच्या गावचे वैशिष्ट्य आहे. आकेरी गावचा रथोत्सव एक मोठा उत्सव होतो. यावेळी गावच्या माहेरवाशिणी गावात येतात. रथोत्सव म्हणजे दसरा व दिवाळीसारखाच गावात उत्सव असतो.''
- बाळकृष्ण राऊळ, ग्रामस्थ.

संपादन - धनाजी सुर्वे